Vasunaka (वासूनाका)
-
Vasunaka (वासूनाका)
|
|
Price:
160
|
Front Cover
|
Back Cover
|
|
वालपाखडी मुंबईत कोठेतरी नांदते आहे. वासूनाका ही तिची चावडी. येथे मामू, डाफ्या, मामा सुर्वे अशी इरसाल पुरुषमाणसे आहेत आणि भानू, बायजी यांच्यासारख्या तरबेज बायका आहेत. मौलागिरी व चैन करणे, लस्सी आणि हातभट्टीची दारू पिणे, आकडे लावणे आणि पोरी फितवणे हाच नाक्यावरच्या टोळक्याचा धंदा आहे.
मुंबापुरीच्या अजस्त्र, अस्ताव्यस्त, गहिऱ्या जीवनावर सभ्य पांढरपेशांचा फेस इथेतिथे संथ रेंगाळत असतो. त्याचा चिकट गढूळ गाळ मात्र अशा पाखाड्यातून व नाक्यावरून ढवळत हिंदकळत राहतो. पाप व पुण्य, सभ्य व असभ्य असे भेद या गाळात बुडून नाहीसे झालेले आहेत. सारेच विलक्षण व भेसूर वास्तव आहे पण ते या नाक्यावरच्या टोळक्याला साधे, रोजचे वाटते.
भाऊ पाध्ये यांनी या वास्तवांचा उग्र कुबट वास या कथांतून पकडला आहे. नावाला मराठी, पण उर्दु, इंग्रजी व खास बनविलेल्या सांकेतिक शब्दांनी भरड झालेली या टोळभैरवांची भाषाच बेडर, लंपट वासनांच्या दर्पाने दरवळणारी आहे. परंतु वासना चाळवणारी अश्र्लीलता पाध्यांच्या या कथांतून नाही.
जे काही आहे, ते भंकसपणाच्या दिशाशून्य जीवनाच्या वास्तवाचे निर्भय चित्रण आहे. वासूनाका ही कादंबरी बकाल महानगरी संस्कृतीतल्या बेकार, तरुण मुलांसंबंधी एकाच वेळी कारुण्य आणि उत्तरे नसलेले प्रश्र्न निर्माण करते. लैंगिक विकृतीचे, मवाल्यांच्या मनातील नैतिक जाणीवेचे, त्यांच्या टोळीच्या आपसातील शिस्तीचे हे चित्रण मराठी साहित्यसृष्टीत एकमेव व विलक्षण असे आहे.