-
Gandhali
ऐतिहासिक व्यक्तींवर लेखन करताना देसाईंच्या लेखणीला विशेष बहर आला आहे. गंधालीतील कथाही अशाच व्यक्तींवर, प्रसंगांवर आधारित आहेत. वाचकांची अभिरूची लक्षात घेऊन ऐतिहासिक व्यक्ती विषयी त्यांनी केलेले कलात्मक पातळीवरचे भाष्य, त्यातील प्रामाणिकपणा आणि त्यामागची तळमळ या कथातून जाणवते. स्वप्नवत वातावरण, करूण, शोकात्म शेवट यानं या कथा वाचकाला भारावून टाकतात देशप्रेम, कलामूल्य अशा गोष्टींसाठी जीवन उधळून देणारी आगळी ठसठशीत व्यक्तीचित्रे यामुळे कथा व कथानायक वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतात. मनाला उदात्ततेची, शौर्याची जाणीव करून देणारे. व्यक्तीचित्रण, विषयांची निवड करण्याचे कौशल्य आणि मनाला गुंग करण्याचा एकूण परिणाम घडवणारे भाषासामर्थ्य यामुळे "गंधाली’ वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे.
-
Radhey (राधेय)
"राधेय’ ही रणजित देसाईची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परिमाण लाभतं. "राधेय’च्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की "राधेय’मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळं आहे. कर्ण म्हणतो "आयुष्यात चारित्र्य जपता आलं, उदंड स्नेह संपादन करता आला, मित्रच नव्हे तर शत्रूही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला तोही परमेश्वररूपाशी. यापेक्षा जीवनाचं यश वेगळं काय असतं? कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी, प्रत्येकाने कधीना कधी वाचावी अशी हृद्य कादंबरी.
-
Shrimaan Yogi
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी । यशवन्त कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवन्त नीतिवन्त । जाणता राजा । समर्थ रामदासांनी वर्णिलेलं शिवरायांचं हे उदात्त, दिव्यभव्य रूप म्हणजे प्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तीरूप आदर्श. मराठ्यांच्या किंबहुना भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ. इतका अपैलू, आवधानी संपूर्ण पुरूष इतिहासात दुसरा नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण. पुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषात होते, ही इतिहासाची नोंद आहे. मुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांमधूनदेखील घडणारे या महापुरूषाचे दर्शन मन भारून टाकते. शिवाजी ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. कितीही काळ लोटला तरी मरगळलेल्या, हताश झालेल्या समाजमनाला खडबडून जाग आणण्याचे सामर्थ्य फक्त शिवचरित्रातच आहे. शिवचरित्राचे भव्योदात्त उत्कट चित्रण करणारी ही कादंबरी. रणजित देसाईंच्या अलौकिक प्रतिभेचं लेणं लेऊन साकार झालेली शिवछत्रपतींची ही चरितकहाणी वाचकांच्या अलोट प्रेमास पात्र ठरलेली आहे.
-
Swami
रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. 1946 साली "भैरव’ या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. 1952मध्ये "रुपमहाल’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत. "स्वामी’ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन,कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही. कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत,माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव,स्वार्थी,भोळसट,राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो. इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी.