-
Countegen
कन्टेजन' ही डॉ. रॉबिन कुक यांची वौद्यकीय पाश्र्वभूमीवरील एक यशस्वी रहस्यमय कादंबरी. विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित 'इंटेलिजंट' गुन्हेगारांची टोळी, त्यांची असाधारण गुन्हेगारी व एका बुद्धिमान, निष्ठावंत व्यक्तीनं ती हाणून पाडण्यासाठी जिवाच्या करारानं घेतलेला त्याचा शोध, या पद्धतीनं गुंफलेलं हे कथानक अत्यंत उत्कंठावर्धक मांडणीमुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेतं. न्यूयॉर्कच्या मॅनहटन जनरल हॉस्पिटलमध्ये कोणत्यातरी अज्ञात संसर्गजन्य रोगानं एकापाठोपाठ एक माणसं मरू लागतात. मुख्य वैद्यकीय तपासनीस ऑफिसातील गुन्हाअन्वेषण विभागातील निष्णात डॉक्टर जॅक स्टेपलटन शवविच्छेदन केल्यावर चक्रावून जातो.. ! हा घातक संसर्गजन्य रोग कोणता ? इन्फ्ल्युएंझा ?.. प्लेग ?.. टुलरेमिया ?.. रॉकी माउंटन स्पोटेड फिव्हर ?... 70-75 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या या रोगांचे विषाणू पुन्हा कसे आले ? या काळात आणि तेही न्यूयॉर्कमधल्या इतक्या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये ? हे विषाणू नैसर्गिकपणे उद्भवले ? की कोणा माथेफिरूदहशतवाद्याचं हे कृत्य ? हॉस्पिटलमधले लोक तरी बचावात्मक का वागतात ? जॅक हात धुवून या प्रकरणाच्या मागे लागतो. सोबत असते त्याची सहाय्यक लॉरी माँटगोमेरी व प्रेयसी होऊ पाहणारी टेरेसा. नॅशनल बायॉलॉजिकल्स्, प्रेझर लॅब, अलास्कातील गोठलेले एस्किमो... शेवटी काय असतं याच्या मुळाशी ? अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडींनी श्वास रोखायला लावणारी ही कादंबरी. या वैज्ञानिक शक्यता कोणत्याही देशात, कोणत्याही काळात प्रत्यक्षात येऊ शकतील, या जाणिवेनं मनाचा थरकाप होतो, हेच डॉ. रॉबिन कुक यांचं यश आहे.
-
Toxin
नुकताच घटस्फोट घेतलेला डॉ. किम रेग्गीस आपल्या एकुलत्या एक मुलीला बेकीला घेऊन एका संध्याकाळी फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये गेला. तिथे बर्गर आणि फ्रेंच फ्राईज खाताना ह्या शोकांतिकेची सुरवात झाली. 'इ. कोलाय' जीवाणूच्या विषामुळे-टॉक्सिनमुळे बेकीचा भीषण अंत झाला. अन्न नीट प्रकारे न हाताळल्यामुळे बेकीला संसर्ग झाला हे उघड दिसत असते. पण ते कोण मानणार ? लाडक्या लेकीच्या मृत्यूमुळे सैरभैर झालेला किम संसर्गाचे कारण शोधण्यासाठी जीवाचे रान करतो. त्याची माजी बायको त्याला या कामात मदत करू लागते. या कामामध्ये त्यांना काय अनुभव येतो ? आपले हितसंबंध जपण्यासाठी कुठल्याही थराला जाणारे, बीफ उद्योगातले प्रचंड ताकद असणारे बेबंद भांडवलदार आणि त्यांची नफा कमावण्यासाठी काहीही करायला मागेपुढे न पाहण्याची हिडीसवृत्ती.
-
Seizure( सीजर)
पेशींचे क्लोनिंग करून मानवजातीला ग्रासणार्या पार्किन्सन्ससारख्या आनुवंशिक विकारांवर उपचार करण्याचे तंत्र विकसित करणारा विलक्षण बुद्धिमत्तेचा शास्त्रज्ञ डॅनियल लॉवेल आणि लोकांच्या भावनांशी खेळून स्वत:चा राजकीय मतलब साधणारा एक महत्त्वाकांक्षी सिनेटर, एकमेकांच्या समोर उभे ठाकतात. पेचातून सुटका व्हावी म्हणून डॅनियल सिनेटर बटलरचा अनौतिक प्रस्ताव मान्य करून कोणी कधी न केलेले जनुक उपचार करायला तयार होतो. उपचारासाठी लागणारे जनुक थेट ख्रिस्ताच्या रक्तापासून मिळवण्याची विलक्षण अट बटलर घालतो आणि त्यातून सुरूहोते ती पेच-डावपेचांची जीवघेणी मालिका...