Nagkeshar (नागकेशर)
प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची ‘नागकेशर’ ही डोंगरे-देशमुख या एकाच कुटुंबातील सहकारमहर्षी बापूराव आणि बबननाना या दोन भावांमधील सत्तासंघर्षाची कहाणी आहे. हा संघर्ष त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्येही चालू राहतो. बापूराव गजरा साखर कारखान्याचे चेअरमन होतात, तर बबननाना कारखान्यात शिरकाव करण्याच्या हेतूने बापूरावांना कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी हरप्रकारे मदत करण्याची भूमिका पत्करतात. बापूंचा मुलगा राजकुमार अर्थात प्रिन्स आणि नानांचा मुलगा बाजीराव. प्रिन्सशी विवाह करण्याची मनीषा बाळगणाऱ्या नेत्रादेवीला विचित्र दैवगतीमुळे बाजीरावच्या गळ्यात वरमाला घालावी लागते; तर नवऱ्याच्या छळाला व मारझोडीला कंटाळून आश्रयाला आलेल्या जिद्दी, करारी व देखण्या शलाकाचा प्रिन्स पत्नी म्हणून स्वीकार करतो. कारखाना, डिस्टीलरी आणि गजरा एज्युकेशनल ट्रस्टची सूत्रे प्रिन्स आणि शलाकाकडेच जातात; पण कारस्थानी सल्लागार बबननाना, रगेल पैलवान बाजीराव आणि स्वार्थांध नेत्रा व तिची सासू चंचलानानी यांच्या कट-कारस्थानांमुळे प्रिन्स आणि शलाकाला सत्तेवरून पायउतार होणं भाग पडतं. प्रिन्स आणि शलाका ती सत्ता परत मिळवतात का, प्रिन्स आणि शलाकाचा राजकारणात प्रवेश, तिथेही शलाकाचा आधीचा नवरा रमेश दिवसे आणि बाजीराव - नेत्राचा चढेल मुलगा सुपरप्रिन्स यांनी शलाका आणि प्रिन्सच्या विरोधात उभे ठाकणे, रमेश - शलाकाचा मुलगा अभिषेकने निवडणुकीत उतरणे, अशा अनेक नाट्यपूर्ण घडामोडींमुळे वाचकाची उत्सुकता शेवटपर्यंत ताणणारी ही कादंबरी अवश्य वाचावी अशी आहे.