Gandhivadacha Chemical Locha Ani Itar Katha (गांधी
लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या संग्रहातील कथांना तसा कुठलेही स्थानवैशिष्ट्य असलेला एक विशिष्ट असा परिसर नाही. त्या एकूणच भारतीय आणि जागतिकही पटलावरही घडतात. विशेषतः सांस्कृतिक बहुविधता हा आशय असणाऱ्या अनेक कथा या संग्रहात आहेत. ही बहुविधता हेच भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. जाती-धर्माच्या सीमारेषा ओलांडून सर्वांच्या मनाला भिडणारे संगीत, परस्परांमधला सद्भाव, सामाजिक सलोखा राखणारे समाजमन, परधर्मीयांच्या श्रद्धांचा आदर करणारी सामान्य माणसे असा या संग्रहातील कथांचा ऐवज आहे. भारतीय समाजातला मुस्लिम हा समाजघटक) आपल्या कथात्म साहित्यात अभावानेच आढळतो. ती उणीव यातील कथांनी भरून काढली आहे. या कथांमध्ये चित्रित झालेल्या समाजजीवनात भिन्न धर्मीयांचे अस्तित्वही ठळकपणे जाणवते. म्हणून या कथा व्यापक अर्थाने समाजजीवन कवेत घेताना दिसतात. कथात्म साहित्यातूनही लेखकाचा विचार डोकावतो. एका प्रागतिक अशा समाजाचे रेखांकन करणाऱ्या या कथा आहेत. विशेषतः सहिष्णुतेचा संकोच होत असलेल्या, एकारलेल्या काळात या कथांचे महत्त्व नक्कीच अधोरेखित होणारे आहे. – आसाराम लोमटे