-
Odh Ishanyechi - Bhag 2 (ओढ ईशान्येची - भाग २)
ज्योतीने हिमालय-सह्याद्री विविधांगांनी पाहिले, परंतु ती इशान्येच्या राज्यांमध्ये गेली नव्हती. तेव्हा तिने आसामच्या दिशेने झेप घेतली. ही गोष्ट सप्टेंबर २०११ ची. तेथे तिला वनवासी कल्याण आश्रमवाले भेटले आणि ती 'स्वयंसेवक' झाली. तिचे कार्य त्यांच्या प्रेरणेने सुरू झाले. तिने नागालँडच्या पेरीन जिल्ह्यांत तीन वर्षे तेंनिग येथील शाळेत शिकवले-मुलींचे होस्टेल सांभाळले. ती २०१५ मध्ये मणिपूरला गेली, २०१७ मध्ये अंदमानला तेथे तिने दोन वर्षे काढली. कोरोनानंतर २०२२ पासून ती जम्मीच्या वेगवेगळ्या वीस खेड्यांत मुलांना विशेषतः मुलींना शिकण्यास प्रवृत्त करत आहे. शिकवत आहेच. तेथेच कुटुंबांत राहत आहे. ज्योतीने या सर्व ठिकाणी काय केले नाही असेच विचारावे लागेल, इतके विविधांगी कार्य. बालविकास व कुटुंबस्वास्थ्य या क्षेत्रांत जे जे गरजेचे ते ते वेळोवेळी केले. बायांना संस्कार, हस्तकला व उद्योग, 'कुकिंग', शिवणकाम, भरतकाम, कृत्रिम दागदागिने, वस्त्रसुशोभन... असे सर्व प्रशिक्षण दिले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलींना व स्त्रियांना आधुनिक जगण्यासाठी बळ दिले. ज्योती ज्या ज्या प्रदेशात या कामानिमित्ताने राहिली, तो प्रदेश अस्वस्थ- अशांत आहे, पण मौज अशी, की तेथील नित्याचे जनजीवन शांत, बरेचसे नियमित असते. ती मणिपूरमध्ये असताना तिने क्षोभ अनुभवला. तिच्या खोलीच्या खिडकीची काच भेदून बंदुकीची गोळी आत आली. ज्येष्ठांच्या सल्ल्याने ती तेथून निघाली आणि नागालँडमध्ये येऊन राहिली. त्या प्रत्येक ठिकाणचे तिचे स्नेहीजन अजून तिच्या संपर्कात असतात. विशेषतः ज्या मुलींच्या मनाने अधिक शिक्षणाची, पुढे जाण्याची उबारी घेतली त्या मुली भारतीय शहरांत पुढील शिक्षण घेण्यासाठी ज्योतीच्या मदतीने येत असतात. ज्योतीची या साहसातील निरीक्षणे प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे बोलकी आहेत. तिने तिच्या आयुष्यातील या नव्या अध्यायाच्या पहिल्या टप्प्यावर 'ओढ ईशान्येची' असे पुस्तक लिहिले होते. ते त्या प्रदेशातील जीवनाचे बरेचसे सरळ निवेदन आहे. पण ज्योतीचा त्यानंतरचा तेथील काळ उग्र आहे; विशेषतः ३७० कलम रद्द केल्यानंतर सुप्तावस्थेतील हिंदू-मुस्लिम संघर्ष भारतात कृतक जाणवतो, परंतु ज्योतीच्या बोलण्यातून मात्र जम्मूमधील ते भय भेदक भासते !