-
Shlok Katha (श्र्लोक कथा)
भाषा शिकण्याचा कंटाळा असणारी मुलंही या शिक्षिकेकडून आनंदाने संस्कृत शिकत. कारण ही शिक्षिका एकदम गोष्टीवेल्हाळ. या शिक्षिकेचं नांव कांचन वाटवे-जोशी. आजच्या मुलांच्या भावविश्वातली छोटीशी रसाळ गोष्ट रचत रचत कांचन त्यांना दरवेळी एकेका श्लोकाकडे घेऊन जाऊ लागली. दर आठवड्याला नवी गोष्ट वाचण्याची उत्सुकता माझ्यासह सर्व वाचकांना वाटू लागली. अनेक विद्यार्थी वाचकांना त्या श्लोककथा भावल्या. शाळांमध्ये बोर्डावर लावल्या जाऊ लागल्या. म्हणून या गोष्टी पुस्तकरुपाने प्रसिध्द करण्याचे ठरवले. बालकिशोर साहित्य कुणालाही आवडतं. या श्लोककथा फारच रोचक आहेत. त्या मनात रेंगाळतात, संस्कृत श्लोकांकडे नव्या नजरेतून बघायला लावतात. लहानपणी संस्कृत शिकत असताना एक गाणं पाठ केलं होतं- सुरससुबोधा विश्वमनोज्ञा, ललिता हृद्या रमणीया । अमृतवाणी संस्कृतभाषा, नैव क्लिष्टा न च कठिना ।। अशा या अमृतवाणीला कांचनने 'अतीव सरला, मधुर मंजुला' अशा रम्य गोष्टींचा साज चढवला आहे. हा एक अनोखा प्रयोग आहे, नवीन साहित्य-प्रकार आहे. 'कांचन'च्या सृजनाचा बहर या पुस्तकाच्या पानापानांत वाचायला मिळतोय. प्रत्येकाने तो जरूर अनुभवावा. - शुभदा चौकर
-
Dikkalayatri-Anya Mitimadhun Aaleli Manas (दिक्काल
अॅडव्होकेट सुशील अत्रे यांच्या कथा गेली दहा वर्षे सातत्याने धनंजय दिवाळी अंकात प्रसिद्ध होत आहेत. अत्यंत सरळ सोपी भाषा, वर्तमानातील घटनेची इतिहासाशी सांगड घालण्याचे कौशल्य यामुळे वाचक कथानकात गुंतत जातो. कथेतील पत्रकार असलेला नायक, त्याला येत असलेले अतिंद्रीय अनुभव, त्यानुसार तो घेत असलेला शोध आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या घटनांची तो आपल्या पद्धतीने घालत असलेली सांगड आपल्याला अधिकाधिक गुंतवून ठेवते. यातील कथा केवळ काल्पनिक असतील अशी शंका सुद्धा वाचकाला येत नाही इतके त्यांनी दिलेले संदर्भ कथेमध्ये चपखल बसलेले असतात. लेखन, वाचन, नाट्य, प्रवास, गिर्यारोहण यांची आवड असलेले सुशील अत्रे उत्तम वाचकही आहेत. त्यांच्याकडील पुस्तकांचा अफाट संग्रह आणि त्याबद्दलचा जिव्हाळा याची साक्ष देत असतात. वाचक नक्कीच ‘दिक्कालयात्री' या कथासंग्रहाचे उत्स्फूर्त स्वागत करतील यात शंका नाही.