The Rainmaker (द रेनमेकर)
-
The Rainmaker (द रेनमेकर)
|
|
Price:
420
|
Front Cover
|
Back Cover
|
|
जॉन ग्रिशॅम हा मुळामध्ये अमेरिकेतला एक प्रथितयश असा वकील होता, आणि नंतर तो पूर्ण वेळ लेखनाकडे वळला. त्यामुळे त्याच्या सगळ्या कादंबर्या या कायदा, वकील, गुन्हेगारी यांच्याशीच संबंधित असतात. 'द रेनमेकर' ही त्याची कादंबरीही कायद्याशीच संबंधित आहे. रुडी बेलर हा अगदी पोरसवदा, कायद्याची परीक्षा नुकतीच पास झालेला एक तरूण वकील असतो. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळे त्याच्याकडे पैशाची चणचण कायमच असते. अत्यंत हलाखीची परिस्थिती, पाठीमागे कोणाचं आर्थिक पाठबळ नाही, शिक्षणाचा खर्च चालूच आहे, आवक मात्र अत्यंत कमी, अशा परिस्थितीत त्याच्यावरची देणी वाढत असतात.
जंग जंग पछाडूनही त्याला नोकरी मिळत नाही. कुठूनशी एक केस मिळते, पण त्याची ती क्लाएंटच इतकी गरीब असते, की तिच्याकडून फी मिळण्याचीही आशा करण्यात अर्थ नसतो. डॉट ब्लॅकनं - रुडी बेलरच्या क्लाएंटनं - एका प्रचंड मोठ्या, श्रीमंत इन्शुअरन्स कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला असतो. डॉनी हा तिचा मुलगा ल्युकेमियामुळे मरणोन्मुख झालेला असतो. त्याच्या ल्युकेमियावर 'बोन-मॅरो ट्रान्स्प्लँट' हा इलाज असतो, पण इन्शुअरन्स कंपनीनं या ऑपरेशनचा खर्च द्यायला नकार दिल्यामुळे त्याला तो इलाज करता आलेला नसतो, आणि आता ती वेळही निघून गेलेली असते. जेमतेम लॉ स्कूल मधून बाहेर पडत असलेल्या रुडी बेलरकडे डॉट ब्लॅक ही केस घेऊन आलेली असते. आणि रुडीनं तर अजूनपर्यंत एकही केस हाताळलेली नसते. इन्शुअरन्स कंपनीच्या अत्यंत प्रसिद्ध वकिलांचा सामना करून, प्रचंड अडचणींना तोंड देऊन रुडी हा खटला चक्क जिंकतो. डॉट ब्लॅकला प्रचंड मोठी रक्कम नुकसान भरपाई मिळणार असते.
आता खरं तर रुडी बेलर कोट्याधीश व्हायला हवा. तो आता चुटकीसरशी पाऊस पाडणारा 'रेनमेकर' झालेला असतो,त्यांच्यापुढे उज्ज्वल भवितव्य असतं.पण आणि या 'पण'मुळेच तो शहर सोडून निघून जातो. ते का, हे समजायला मात्र पुस्तकच वाचायला हवं.या पुस्तकामध्ये जॉन ग्रिशॅम या मूळ लेखकानं एका वेगळ्याच पद्धतीच्या भाषेचा वापर केलाय. एक प्रकारची बोचरी, विषादपूर्ण, ज्याला 'ब्लॅक ह्यूमर' म्हणता येईल अशी ही भाषा आहे, आणि अनुवादकानंही ती मराठीत तशीच्या तशी उतरवली आहे.
त्याखेरीज, मूळ लेखकानं या कादंबरीत कथाकथनासाठी जी एक खास शैली वापरली आहे, ती इंग्रजीमध्ये क्वचित वाचनात येते, पण मराठीत मात्र विशेषत: कथालेखनामध्ये ती पुष्कळ ठिकाणी आढळते. ही शैलीसुद्धा अनुवादकानं पूर्णपणे तशीच ठेवलेली आहे. त्यामुळे पानांची संख्या मोठी असूनही हे पुस्तक वाचनीय झालं आहे. विशेषत: ज्या वाचकांना 'कोर्टरुम ड्रामा' वाचायला आवडतात, त्यांना तर हे पुस्तक फारच आवडेल.