The Client ( द क्लायंट )
-
The Client ( द क्लायंट )
|
|
Price:
300
|
Front Cover
|
Back Cover
|
|
जॉन ग्रिशॅम मुख्यत: न्याययंत्रणेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कादंबर्या लिहितात. 'अ टाईम टू किल’, 'द फर्म’, 'द पेलिकन ब्रीफ’ इत्यादी त्यांच्या कादंबर्या जगभरच्या वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. सामाजिक दृष्टीकोनातून खिळवून ठेवणारी कथानकं शैलीदार पद्धतीनं मांडणं, हे ग्रिशॅम ह्यांचं मुख्य वैशिष्ट आहे आणि त्यामुळेच ग्रिशॅम ह्यांच्या कादंबर्या लोकप्रिय ठरल्या आहेत.
प्रस्तुत 'द क्लायंट’ कादंबरीत मार्क नावाचा एक अकरा वर्षांचा मुलगा कथानकाच्या केंद्रभागी आहे. मार्क त्याच्या भावाबरोबर-रिकीबरोबर-घराजवळच्याच जंगलात रमतगमत असताना एक चमत्कारिक घटना घडते. एक वकील आत्महत्या करताना ही मुलं बघतात. आत्महत्येआधी हा वकील मार्कपाशी काही रहस्यं उघड करतो.
काही वेळानं मार्क ते रहस्य वगळून फक्त ह्या घटनेची बातमी पोलिसांना कळवतो. दरम्यान रिकीला मानसिक धक्का बसतो. कुतुहलापोटी मार्क त्या घटनेच्या ठिकाणी पुन्हा गेलेला असताना पोलिस त्याला गाठतात. तिथूनच मार्कवर ह्या कथानकाचा रोख केंद्रित होतो. न्याययंत्रणेच्या दृष्टीनं मार्क महत्त्वाचा साक्षीदार ठरतो. एकीकडे गुन्हेगारी वर्तुळही मार्कचा माग घेत फिरू लागतं. ह्याचं कारण म्हणजे ह्या घटनेचा संबंध एका राजकारणाच्या हत्येशी असतो.
मार्क ह्या परिस्थितीत, विशेष म्हणजे स्वत:च एका स्त्री वकिलाची मदत घेतो. तिचं नाव रेगी लव्ह. हे दोघं एकीकडे न्याययंत्रणा तर दुसरीकडे गुन्हेगारी वर्तुळाला हुलकावणी देत मुख्य पुरावा शोधून काढताना आणि मार्कवरचं सावट दूर होतं.
ग्रिशॅम ह्यांचा समाजाच्या वेगवेगळ्या थरातल्या व्यक्तिरेखा जिवंतपणे रेखाटण्यात हातखंडा असल्यानं हे कथानक जिवंत, प्रभावी होतं. न्यायंत्रणा, गुन्हेगारी वर्तुळ आणि राजकारण ह्यांचे धागेदोरे असलेल्या 'द क्लायंट’ मध्ये अखेरपर्यंत गुन्हेगारी जगताची दहशत जाणवते, त्यामुळे मार्कची ही लढत खिळवून ठेवते, अंतर्मुख करते.