-
Asa Ghadlo Mi (असा घडलो मी)*
विदर्भातील एका खेड्यात गरीब महार कुटुंबात तो जन्माला आला. खाण्याची आबाळ आणि उपचारांचा अभाव यामुळे त्या कुटुंबात मुलं जगत नसत. पण तो जगला. कधी मागते मागून मिळालेलं, तर कधी शिळंपाकं अन्न, कधी मेलेल्या गुरांचं मांस यावर तो वाढला. आईबरोबर तो शेतमजूर म्हणून कामाला जायचा. लाजिरवाणं जिणं जगत होता तो आणि त्याच्या वस्तीतील बाकीचेही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वस्तीच्या जीवनात प्रकाश पेरला. आंबेडकरांच्या विचारांनी त्याचंही घर उजळलं. तो शिकू लागला. शिष्यवृत्ती मिळत गेली आणि तो शिकत शिकत दिल्लीतील जेएनयुमध्ये पोचला. हा प्रवासही सोपा नव्हता. प्रत्येक टप्प्यावर अडथळे होते. अगणित अडचणींतून वाट काढत तो चालत राहिला आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यानं स्वतःला सिद्ध केलं. देशापरदेशात स्वतःचं अस्तित्व जाणवून दिलं. विदर्भातील एक दलित मुलगा समाजशास्त्रज्ञ होण्याचा हा रोमांचक प्रवास व्यक्तिगत उरत नाही; तो समाजाच्या खालच्या थरातील माणसांच्या जीवनसंघर्षाचा वर्णनात्मक आलेख बनतो.
-
Matiche Mama Avaghe Jivan (मातीचे मम अवघे जीवन)
‘द डर्टी लाइफ’ कथा आहे मुक्त पत्रकार असणारी क्रिस्टीन आणि शेतकरी मार्क यांची. शहरी जीवनात रमणारी क्रिस्टीन शेतकरी मार्कची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने त्याच्या गावी जाते. हाडाचा शेतकरी असणाऱ्या मार्कचे रांगडे रूप तिला आवडते. केवळ गंमत म्हणून शिकार न करता आपल्या पिकांचे संरक्षण व अन्न मिळवण्यासाठी शिकार करणारा मार्क तिला प्रभावित करतो. मार्कबरोबर शेतावर राहण्यात, त्याच्या कृषिकार्यात मदत करण्यात तिला आनंद वाटू लागतो. शाकाहारी असूनही मार्कने बनविलेले मांसाहारी पदार्थ तिला चविष्ट वाटू लागतात. मार्कच्या गोठ्यातील डुकरं, कोंबड्या, गाई, घोडे व त्यांच्याशी संबंधित माहितीतही तिला रस वाटू लागतो. मार्क आणि क्रिस्टीन यांच्यातील प्रेम हळूहळू फुलू लागतं. मार्कलाही क्रिस्टीन आवडू लागते. विवाह ठरल्यानंतरचा बराच काळ ते एके ठिकाणी पडीक शेत कराराने घेऊन ते फुलवण्यासाठी प्रचंड कष्ट करतात. हळूहळू क्रिस्टीन शेतीसंबंधित सर्व कामे शिकून करू लागते. खरंतर कृषिकर्मांची सवय नसतानाही क्रिस्टीन तिच्या मनातील शहरातील सुखसोयीयुक्त जीवनाचे विचार दूर सारून मार्कच्या प्रेमाखातर त्याच्या बरोबरीने शेतावर कष्ट करते. दोघांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रंगवण्यात मग्न असणारी क्रिस्टीन शेत, पाळीव प्राणी, त्यांचं जीवन याविषयी खूप अनुभव घेते. शहरी जीवनात ज्या गोष्टींपासून ती अनभिज्ञ होती, अशा सर्वच गोष्टी तिला फार जवळून अनुभवायला मिळतात. शेतीकाम करताना करावे लागणारे कष्ट, येणाऱ्या अडचणी यामुळे काही वेळा खचणारी क्रिस्टीन हळूहळू शेतीलाच आपलं सर्वस्व मानू लागते. विवाहानंतर एकमेकांच्या मदतीनं ते आपल्या शेतवाडीला खूपच समृद्ध करतात आणि शहरात वाढलेल्या क्रिस्टीनचे कष्टांनी ‘अवघे जीवन मातीचे’ होऊन जाते.