-
Kalachakra (कालचक्र)
गाढे अभ्यासक, संशोधक, संपादक-लेखक आणि ग्रंथप्रेमी असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. अरुण टिकेकर यांचे समाजमानसात घडत असलेल्या बदलांकडे, वृत्ती-प्रवृत्तींकडे किती बारीक लक्ष होते, याची साक्ष हा लेखसंग्रह वाचताना पटते. सदरलेखनाच्या निमित्ताने केलेल्या स्फुटलेखांमधून डॉ. टिकेकर सामाजिक-राजकीय विषयांवर मार्मिक भाष्य करतात. तसंच मर्मज्ञ रसिकतेने जुन्या मौलिक ग्रंथांची ओळख करून देतात. कधी साहित्य, क्रीडा आणि कला-संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील तत्कालीन घटना-प्रसंगांवर उपरोधिक शैलीत भाष्य करतात. एखाद्या ज्येष्ठ आणि अभ्यासू मित्राने सहज गप्पा माराव्यात, आपल्याला उमजलेलं काहीतरी सांगावं अशी या लेखांची ओघवती शैली आहे. हे लेख विचारप्रवृत्त करतात, क्षणाक्षणाला वेगाने फिरत राहणार्या 'कालचक्रा'चं भान देतात!
-
Kalantar (कालान्तर)
गेल्या पन्नास-साठ वर्षांत आपल्या समाजात झालेल्या पडझडीचे चित्रण करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.स्वातंत्र्याच्या कालखंडात महाराष्ट्राने काय गमावले, काय कमावले याचा आलेख काढणारा.त्यात कमावण्याच्या बाजूला थोडेच आणि गमावण्याच्या बाजुला भरपूर असल्याचेच आढळून आले.समाजबदल तर होत होता.तो केवळ बाह्यस्वरूपी होत आहे,का केवळ तंत्रंयानाने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत,की समाजमन वैंज्ञानिक विचारांची कास धरून विवेकवादी होत आहे,धर्माचे अवडंबर कमी होत आहे की वाढत आहे,असे प्रश्नही मनात येऊ लागले... प्रश्नांची उत्तरे शोधू गेल्यास ध्यानात येते की,ज्या प्रकारची पडझड झाली आहे ती स्वागतार्ह बदलापेक्षा किती तरी अधिक आहे... या कालखंडात आपण काय मिळवले आणि काय गमावले याची चर्चा तर सुरूवातीला केली पाहिजे.शिक्षणापासून ते वेगवेगळ्या व्यवसायापर्यंत,समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत,व्यक्तिगत जीवनापासून ते सार्वजनिक जीवनापर्यंत विविध क्षेत्रांतील पडझडीची चर्चा करणे एवढाच या लेखसंग्रहाचा मर्यादित हेतू!
-
Iti - Aadi (इति - आदि)
‘‘वाचक या पुस्तकात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो,' असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात.... या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात....''