-
Hiravi Portrets (हिरवी पोर्ट्रेट्स)
`हिरवी पोर्ट्रेट्स' हा ललित लेखसंग्रह म्हणजे कोकणच्या अंत:स्पंदनांची रम्य स्मरणयात्रा. बेर्डेंमधला लेखक - दिग्दर्शक - चित्रकार - नेपथ्यकार - पार्श्वसंगीतकार - जाहिरात कलाकार - वाद्यवृंदकार कसा घडत गेला, नावारूपाला आला, याचीही प्रेरणादायक कहाणी या ललित गद्यामधून आपल्याला कळते. कोकणची भूमी अनेक कलावंतांची जन्मदात्री आहे. संगीत, नृत्य, अभिनय, दिग्दर्शन, चित्र, शिल्प अशा अनेकविध क्षेत्रांत कोकणपुत्रांनी व कोकणकन्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. स्वतंत्र प्रज्ञा, जिद्द, उद्यमशीलता, साहसीपणा, एखादं काम अत्यंत चिकाटीने पूर्णत्वास नेण्याची आकांक्षा, श्रद्धाशीलता या गुणांमुळे आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा राष्ट्रीय स्तरावर उमटविणारे अनेक गुणीजन कोकणभूमीत निर्माण झाले. आपले भूमिसंस्कार घेऊन स्वत: वाढत राहिले. राष्ट्र, समाज, संस्कृती, धर्म, विविध कला, क्रीडा, शिक्षण, संशोधन, राजकारण, व्यापार-उद्योग अशा विविध क्षेत्रांत या कर्तृत्ववान माणसांनी जे योगदान दिले; त्याचे `हिरवी पोर्ट्रेट्स'मधून अंशत: दर्शन घडते. हे लेखन केवळ `कोकण प्रशंसापुराण' नाही. त्यातील आत्मचिकित्सा, समाजचिकित्सा, अंतर्मुखता, वास्तव निरीक्षणे आणि समकाळाशी जोडून घेण्याची सकारात्मकता लक्षणीय आहे. डॉ. महेश केळुसकर
-
Close Encounters (क्लोज एनकाउंटर्स)
क्लोज एनकाउंटर्स’ मध्ये दिसणारा कामाठीपुरा हा सत्तर आणि ऐंशीच्या दशकातला आहे. यातल्या चोवीस भागांतून पुरुषोत्तम बेर्डे आपलं बालपण, पौगंड आणि तारुण्य यांच्या साक्षीने अनेक माणसांच्या आयुष्यांच्या आत डोकावतो. मराठी साहित्यातली व्यक्तिचित्रांची दोन तालेवार पुस्तकं मला चटकन आठवतात. एक अर्थातच पुलंचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि दुसरं जयवंत दळवींचं ‘सारे प्रवासी घडीचे’. दोन्ही पुस्तकांची साहित्यिक गुणवत्ता मोठी आहे. ‘क्लोज एनकाउंटर्स’ मध्ये या दोन्ही पुस्तकांपेक्षा एक गोष्ट अधिक आहे. ती म्हणजे भौगोलिक सलगता. कामाठीपुऱ्याच्या सोळा गल्ल्या. त्यातली अखंड चालणारी राडेबाजी. सिनेमा आणि गल्ली क्रिकेट. पुरुषोत्तमने स्वत: मोकळं होण्याची जी प्रक्रिया अनुभवली त्याचं फलस्वरूप म्हणजे हे पुस्तक. जयंत पवार