-
Leedar (लीडर)
हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरी करताना एकीकडे कायद्याच्या क्षेत्रात मिळवलेल्या अनेक पदव्या. शिवाय पीएच.डी. सारखी उच्चतम पदवी गाठीशी! असं असतानाही त्या पलीकडे जात युनियन लीडर म्हणून स्वभावानुसार कामगारांच्या प्रश्नांशी सातत्याने भिडत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे डॉ. अशोक भाईडकर यांचे हे जिवंत अनुभव काळजाला भिडतात. कारण ते अत्यंत खरे आहेत! मिळवलेल्या अधिकारपदाला रामराम ठोकून युनियन लीडर म्हणून आयुष्य जगलेला हा कामगारबंधू कोणत्याही आकर्षणांपासून अलिप्त राहत, त्यांना बळी न पडता 'लीडर' म्हणून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत राहिला. 'मोडेन पण वाकणार नाही' ही उक्ती अंगी बाणवत लढत राहिला. आजमितीला मात्र कठोरपणे केलेल्या परीक्षणातून ते या निष्कर्षाप्रत येतात- आज भारत सरकारची लेबर पॉलिसी पूर्णपणे बदलली आहे. सर्वच कामं कॉन्ट्रॅक्टरतर्फे केली जात आहेत. आमच्या कंपनीत मागच्या वीस- पंचवीस वर्षांत वर्कर्सची नवीन भरती झाली नाही. जिथे दहा-पंधरा हजारांत वाटेल तेवढे कॉन्ट्रॅक्ट लेबर, फॅज्युअल लेबर मिळतात त्यामुळे वर्कर्सना लाखो रुपयांचा पगार देण्याची कंपनीला गरज वाटत नाही. जर परमनंट वर्कर्सच नाहीत तर युनियन कशी राहणार ? गव्हर्मेंटच्या या पॉलिसीमुळे आज तरुणवर्ग देशोधडीला लागला. हायर ॲन्ड फायर सीस्टिममुळे तरुणाला कुठल्याच कंपनीत भविष्य राहिलं नाही. कंपनीत कायम कामगार नाही म्हणून युनियन नाही आणि युनियन नाही म्हणून लीडर नाही ! ---- डॉ. अलका आगरकर-रानडे
-
Aawas (आवस)
माझी आवस, माझी आई तिचे जीवनरुपी विश्व या कादंबरीत उलगडताना आणि तू पूर्ण झाल्यावर मनावरचे एक ओझे उतरल्यासारखे झाले आहे. तिच्या जीवनाचे सत्यचित्र रेखाटताना मनाची खूप घालमेल झाली होती. जसेच्या तसे वास्तववादी चित्रण करणे आवश्यक होते. तिने भोगलेल्या अनंत यातनांचे चित्र समाजातील ख-या मातृप्रेमीना समजणे आवश्यक होते. मला हे माहीत आहे, जगातील सर्वच माणसांना आपली आई देवताच वाटवते व पुढे आयुष्यभर त्या आपल्या मुलासाठी नि:स्वार्थीपणाने झटते, ती प्रत्येक आई मुलाची पहिली गुरु असते. आपल्या मुलाच्या सुखासाठी काळीज काढून देणारी माता असते. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात पुढे अनेक स्त्रिया येतात पण आई आईच असते. देवाच्या पुढचे उच्चस्थान तिथे असते. ज्या घरात आई असते ते देऊळ असते.