-
Ambedkar Jivan Ani Varsa (आंबेडकर जीवन आणि वारसा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव आज सर्वांत आदरणीय भारतीयांच्या नामावलीत घेतलं जातं आणि देशभरातील त्यांच्या पुतळ्यांची संख्या महात्मा गांधींच्या पुतळ्यांखालोखाल असेल. किंबहुना, आधुनिक काळातील 'सर्वांत थोर भारतीय' ठरवण्यासाठी अलीकडे एक मतचाचणी घेण्यात आली, त्यात दोन कोटींहून अधिक मतं नोंदवली गेली आणि त्यात आंबेडकरांना गांधींपेक्षा जास्त मतं मिळाली होती. आज सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आंबेडकरांवर हक्क सांगण्यासाठी चढाओढ सुरू असते. मुख्यत्वे आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आली आणि दलित समुदायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला, त्यामुळे दलित समूहांमध्ये ते एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला जातो. व्यक्तीच्या अधिकारांची पाठराखण करणाऱ्या व दडपलेल्यांची उन्नती साधू पाहणाऱ्या उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, अनेकत्ववादी मूल्यांसह भारत आजपर्यंत लोकशाही म्हणून टिकला, त्याचं मुख्य कारण संविधान हे आहे (पण सध्या ही सर्व मूल्यं संकटात अडकली आहेत). 'डॉ. आंबेडकरांची थोरवी केवळ एकाच उपलब्धींपुरती मर्यादित मानता येत नाही, कारण सर्वच बाबतीत त्यांनी सारखीच असामान्य कामगिरी केली,' असं शशी थरूर लिहितात. आंबेडकरांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवनपट प्रस्तुत चरित्रात संक्षिप्तपणे, सुबोधपणे, मार्मिकपणे व आदरभावाने उलगडला आहे.
-
Paraka (परका)
फ्रेंचांची वसाहत असणारा १९३०-४०च्या दरम्यानचा उत्तर आफ्रिकेतला अल्जीरिया देश. त्याची राजधानी अल्जीअर्स या अल्जीअर्समध्ये राहणाऱ्या मेर्सोच्या आईचं निधन होतं. मेर्सो तिच्या दफनविधीला उपस्थित राहतो. नंतर मेर्सोच्या आयुष्यात कमी- अधिक व्याप्तीच्या अनेक घटना घडत राहतात. काही घटनांना तो नुसता साक्षी असतो, तर काही घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो. दरम्यान, ऊन, आजूबाजूचे आवाज, माणसं, गाड्या हे सगळं त्याला जाणवत राहतं. मग समुद्रकिनारी त्याच्या हातून खून होतो. त्याच्या विरोधात खटला उभा राहतो. हे सगळं कसं होत जातं? खून का होतो? खटल्यात काय होतं? या सगळ्याची गोष्ट खुद्द मेर्सोच्या तोंडून सांगणारी 'परका' ही आल्बेर काम्यू यांची कादंबरी फ्रेंच भाषेत 'लेत्रांजे' म्हणून १९४२ साली प्रसिद्ध झाली. इंग्रजीत 'द आउटसायडर' म्हणून तिचं भाषांतर झालं. १९५७ साली साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या आल्बेर काम्यू यांची ही कादंबरी वेळोवेळी कौतुकाचा, टीकेचा, चिकित्सेचा विषय होत राहिली आहे. तिच्या प्रकाशनाला ऐंशी वर्षं झाली असली, तरी आजसुद्धा ही कादंबरी वेगवेगळ्या अर्थांना वाव देणारी ठरावी.