-
Jhad Ek Mandir (झाड एक मंदिर)
'झाड एक मंदिर' एक वेगळे आणि उत्सुकता वाढवणारे शीर्षक असणारी स्वाती कान्हेगांवकरांची किशोर कादंबरी संवेदनशील बोधप्रद आणि किशोरांना खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीतील हेमाआजी स्वत:च्या परदेशी असणाऱ्या नातवंडांच्या प्रेमासाठी व्याकुळ होते; पण आपले प्रेम, माया, वात्सल्य आजूबाजूच्या किशोरवयीन मुलांना भरभरून देऊन त्याच मुलांना आपली नातवंडे मानते. त्या मुलांना रसाळ गोष्टींतून संस्काराची शिदोरी देते आणि मुले संस्कारित होतात. आजीने दिलेली शिकवण मुलांमध्ये परिवर्तन घडवते याचा परिणाम, गोष्टीतील नाना-तात्या आजोबांचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार मुले करतात तेव्हा वाचकांचेही डोळे पाणावतात. आजी आणि नातवंडांचे प्रेम पाहून खरंच कधी-कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती दाट आणि जवळची होतात याची प्रचिती येते. झाडाचे रक्षण-संवर्धन, मुक्या प्राणिमात्रांवर प्रेम करा, भूतदया दाखवा, चराचर सृष्टीत ईश्वराचे रूप पहा, एकमेकांना सहकार्य करा अशा अनेक मूल्यांची रुजवण करणारी ही कादंबरी किशोरांच्या मनात एक नवज्योत प्रज्वलित करते. 'पुढे काय'च्या शोधात कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावी वाटत नाही यातच लेखिकेचे यश आहे. कादंबरी वाचताना लेखिकेची संवेदनशीलता पानोपानी दिसते. अनेक मूल्यांना सहजतेने लेखिकेने किशोरवयीन मुलांवर बिंबवण्याचा केलेला प्रयत्न अधोरेखित करण्यासारखा आहे. लेखिका स्वाती कान्हेगांवकर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! -डॉ. अलका सुरेंद्र पोतदार