-
Surya Girnari Mi (सूर्य गिळणारी मी)
एका कार्यकर्तीचं आत्मकथन “लग्न ही स्त्रीला एवढं आमूलाग्र बदलवणारी घटना असते? जर ती दोन जिवांची एकरूपता असेल, तर तिच्या सगळ्या अस्तित्वासह का नाही नवरा तिला स्वीकारत? का तिलाच तिच्यातून बरंच काही वजा करावं लागतं? मी माझ्या 'स्व' लाच वजा करायचं? नाही. बस झालं आता. मला जगायचं आहे. मला जगायचंच आहे. मला माझं स्वातंत्र्य हवं आहे . अगदी शेवटचे काही महिने माझी सर्व गात्रं बधिर झाली होती. दुःख, आनंद याच्यापलीकडे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, याची मला पूर्णपणे जाणीव झाली होती. स्वप्नहीन, भविष्यहीन, भावनाविरहीत, निर्जीव अशी होऊन गेले होते मी. ही अशी अरुणा तर माझ्या ओळखीचीच नव्हती. ओठांतून रक्त आले तरी वेदना होत नव्हत्या. कित्येक दिवस उपाशी ठेवले तरी मला भूक लागत नव्हती. ओठ आणि जीभ जखमी असताना जबरदस्तीने मला गरम चहा प्यायला लावला तरी वेदना होत नव्हत्या, की त्या मी माझ्या मनाला जाणवूच देत नव्हते? मी बधिर झाले होते हेच खरे! ज्या क्षणी मला असं वाटलं आता आपण इथे वाचू शकत नाही त्या क्षणी एका सकाळी मी माझ्या अंगावरच्या वस्त्रांनीशी घर सोडलं लपतछपत गल्लीबोळांतून जात होते. रस्त्यात एक टेलिफोन बुथ दिसला. थकलेल्या मेंदूला काहीतरी जाणीव झाली. बहिणीला फोन लागला. तिथून जवळच असलेल्या मोठ्या ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्यात मी जाऊन बसले. तिथे घ्यायला माझा भाचा आशू आला; मला भिकारीण समजून तो माझ्या समोरून मलाच शोधत पुढे निघून गेला.” अशा अत्यंत दाहक अनुभवातून तावून सुलाखून निघालेला एक जीवन प्रवास! वाचायलाच हवं असं एका कार्यकर्तीचं प्रेरणादायी आत्मकथन!!