-
Hits Of Ninety Two (हिट्स ऑफ नाईन्टी टू)
ज्याचे कुणी नसते त्याचा हिंदी सिनेमा असतो. माझ्या आतमध्ये खोलवर घट्ट रुतून बसलेल्या ह्या जीवनावश्यक भावनेला अनेक वर्षांनी पुन्हा आठवणींचा मोहोर फुटला तो पंकज भोसलेच्या कथांमुळे. एका विशिष्ट विनोदबुद्धीने साकारलेल्या ह्या कथा नुसत्या परिसर कहाण्या नसून नव्वदीच्या दशकातील, महाराष्ट्रातील शहरी तरुणाची मनःस्थिती सांगणाऱ्या ऑडिओ कॅसेट्स आहेत. पंकजने कथा लिहिताना कॅसेटवरील ट्रॅक्सना नंबर द्यावेत तसे प्रकरणांना नंबर दिले आहेत. अभिजात जगणे, अभिजात ऐकणे, अभिजात पाहणे ह्या संस्कारांना चुना लावून, आधीच्या पिढीने पोसलेल्या फालतू आदर्शवादाला मधले बोट दाखवून, मोठ्या लाटेप्रमाणे आलेल्या हिंदी भाषेतील पॉप्युलर करमणुकीच्या संस्कृतीला नुसते आपलेसे करूनच नाही, तर त्यातील गाभ्यावर विश्वास ठेवून, आपले आयुष्य आखणाऱ्या स्थलांतरउत्सुक नव्वदीच्या मराठी तरुण पिढीचे हे कथारूपी विश्व आहे.
-
Vishwamitra Syndrome (विश्वामित्र सिण्ड्रोम)
विसाव्या शतकाच्या अखेरीला जागतिकीकरण नामक काहीतरी झालं आणि त्याचे पडसाद समाजाच्या सर्व थरात उमटले. जग लहान झालं. इंटरनेटच्या माध्यमातून हव्या नको त्या बऱ्याचशा गोष्टी थेट आपल्या दारात येऊन पोचल्या आणि त्यांनी आपल्या जगण्याचं तंत्रच बदलून टाकलं. ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या जोडकथा या अशा मोठ्या बदलाच्या साक्षीदार आहेत. वरवर पाहता त्या मुंबईनजीकच्या एका वस्तीत इंटरनेटवरून अवतरलेल्या पोर्नोग्राफीचा आणि त्यामुळे वरकरणी पापभीरू वाटणाऱ्या समाजातल्या विविध वृत्तीदर्शनाचा धांडोळा घेतात, पण प्रत्यक्षात तो त्यांचा केवळ एक पैलू आहे. तंत्रज्ञानापासून संगीतापर्यंत आणि राहणीमानापासून नातेसंबंधांपर्यंत आपला भवताल कसा बदलत गेला, याचं हे एकाच वेळी धक्कादायक तरीही गमतीदार असं दर्शन आहे. पंकज भोसले हा पत्रकार असण्याबरोबर सिनेमा आणि साहित्याचा चाणाक्ष अभ्यासक आहे, एका अस्वस्थ काळाचा निरीक्षक आहे. आणि त्याचं हे टोकदार निरीक्षण ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या कथांना त्यांच्या साऱ्या विक्षिप्तपणासह जिवंत करतं.