-
Mudi (मुडी)
ही आहे दिलीप अनंत सावंत यांच्या गावाकडच्या हृद्य आठवणींची मुडी. १९७० च्या दरम्यानचं कोकणातलं सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं गाव, साधेपणानं पण स्वाभिमानानं जगणारी आपल्या कुटुंबातली माणसं, नमुनेदार गाववाले, शेती-भाती, झाडं-पेडं, पशु-पक्षी यांच्या आठवणी काढत ही कहाणी सुरू होते. काही सुखद स्मृती, काही व्याकुळ करणाऱ्या. यातून आत्मशोध घेता-घेता लेखक समस्त ग्राम समष्टीला आपल्या वेंगेत घेऊ पाहतो. ऐकत रहाव्यात अशा 'गजाली' सांगत राहतो. आजच्या काळाशी स्वतःला आणि वाचकांना जोडून घेत आठवणींची मुडी सोडत आणि पुन्हा घट्ट बांधत राहतो. 'मुडी' म्हणजे तांदूळ साठवून ठेवायची गवताची मोठ्या आकाराची खोबण. मुडी बांधण्याचं आणि ती घट्ट रहावी म्हणून भवताली दोरी गुंडाळण्याचं कसब सगळ्यांकडेच नसतं. मुडी बांधणारा आचार- विचारांनी स्वतः एकसंघ असावा लागतो. कलावंत मनाचा असावा लागतो. लेखकाचे आजोबा लाडोबा सावंत-पटेल फोंडाघाट पंचक्रोशीत मुडी बांधण्यासाठी नावाजलेले शेतकरी होते. त्यांच्या नातवाचं हे लेखनही त्यांच्याच वाटेवरुन शब्दपंढरीच्या दिशेने निघालं आहे.