-
Beyond Fear (बियॉण्ड फीअर)
वीरचक्रविजेते विंग कमांडर ओ. पी. तनेजा यांच्या नेतृत्वाखाली १९६५ साली पाकिस्तानातील सरगोधा हवाई क्षेत्रावर घातल्या गेलेल्या हवाईछाप्याचा, मनाची पकड घेणारा लेखाजोखा. भय हे अपवादात्मक नसून सर्वच माणसांमध्ये असते हे सांगणाऱ्या, मेजर जनरल इयन कार्डोझो यांच्या 'बियॉण्ड फीअर' या पुस्तकातल्या, या काही कथा. खरा प्रश्न वेगळाच आहे. आपण भीतीचा सामना करतो की त्यापासून पळ काढतो हाच तो प्रश्न. सैन्यदलातले कर्मचारी या भयावर मात कशी करतात हे मेजर जनरल कार्डोझो या तेरा कथांच्या माध्यमातून सांगतात. ते याला 'बायटिंग द बुलेट' म्हणतात. भीतीवर मात करण्याच्या प्रवासात सैनिकाला सन्मान, प्रेम, धैर्य, विश्वास, आशा, निष्ठा हे गुण कसे उपयुक्त ठरतात याच्या कहाण्या मेजर जनरल कार्डोझो अनेक पदरांद्वारे उलगडत जातात. हेच गुण वाचकांनाही त्याच्या दैनंदिन आयुष्यातल्या आव्हानांवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. वास्तव आयुष्य हे कल्पनेहूनही विलक्षण कसे ठरू शकते याचा प्रत्यय या कथा देतात.
-
Raya (राया)
कृष्णदेवराय हा बहुजन पार्श्वभूमीतून पुढे आलेला राजपुत्र सन १५०९मध्ये विजयनगरच्या सिंहासनावर विराजमान झाला. एकीकडे कमकुवत झालेलं साम्राज्य आणि दुसरीकडे चोहो बाजूंनी शत्रू अशा, प्रसंगी खचवून टाकणार्या परिस्थितीला कृष्णदेवराय धैर्याने समोरा गेला आणि आणि आपल्या २० वर्षांच्या विलक्षण कार्यकाळात त्याने इतिहास घडवला! आपल्या कारकिर्दीतल्या सर्व लढाया तो जिंकला आणि त्याने दक्षिण भारताला एकअमली छत्राखाली आणलं. आज कृष्णदेवराय भारतीय इतिहासातल्या थोर राजांपैकी एक मानला जातो, ते केवळ रणांगणावर त्याने अतुलनीय यश मिळवलं म्हणून नाही, तर तो खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरचा पहिला भारतीय राजा होता म्हणून. जागतिकीकरण आणि बहुसांस्कृतिकता यांसारख्या आव्हानांना त्याला तोंड द्यावं लागलं होतं. या सांस्कृतिकदृष्ट्या गतिशील कालखंडाने कृष्णदेवरायाला भारतीय इतिहास आणि परंपरा यांचा अभ्यास करण्याची प्रेरणा दिली. एक ‘तत्त्वज्ञ-राजा’ असलेला कृष्णदेवराय स्वतः एक निष्णात कवी होता. या विलक्षण आणि उत्कंठावर्धक पुस्तकात अत्यंत सूक्ष्म संशोधनाची रंजक मांडणी करण्यात आली आहे. पोर्तुगीज आणि फारसी स्रोतांबरोबर अनेक दुर्लक्षित तेलुगू स्रोतांवर हे पुस्तक आधारित आहे. थोर सम्राट कृष्णदेवराय याचं हे मनोवेधक चरित्र इतिहासप्रेमींच्या व रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास वाटतो.