-
Jani Janardan- Vinchudanshavaril Lasiche Pravartak
देवमाणूस म्हणून प्रसिद्ध असलेले विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक,माजी आमदार कै. डॉ. श्रीधर दत्तात्रय उपाख्य तात्यासाहेब नातू यांचा जीवनपट या चरित्रलेखनातून त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांसह सामोरा येत आहे. त्या काळी विंचवाच्या दंशामुळे होणारे आजार व मृत्यू यांवर योग्य उपचार होण्यासाठी तात्यासाहेबांनी प्रचंड परिश्रम घेतले. विविध भूमिकांमध्ये समाजासाठी काम करीत राहिलेल्या तात्यासाहेबांचे काम आता दंतकथा वाटावे, इतक्या विलक्षण घटनांनी भरलेले आहे. त्या साऱ्यांचे संकलन या चरित्राच्या निमित्ताने करण्यात या पुस्तकाचे लेखक श्री. धीरज वाटेकर यांना यश आले आहे. संदर्भांची रेलचेल असलेला हा अवडंबरहीन व रसाळ दस्तावेज आहे. सर्वार्थाने सार्थक असलेले ध्येयवेड्या, निष्ठावेड्या लोकसेवकाचे जीवन कसे असते, याचा वस्तुपाठ या चरित्राच्या निमित्ताने असंख्य वाचकांच्या समोर जात आहे, याबद्दल मी अतिशय समाधानी आहे. तात्यासाहेबांसारखी लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वे व्यक्ती, कुटुंबे आणि समाजाच्या कल्याणासाठी स्वत:च्या अद्वितीय गुणांचा निःस्वार्थ वापर करतात. अशा व्यक्तिमत्त्वांमध्ये केवळ इच्छा असून चालत नाही. त्यांच्यात सहानुभूती, करुणा, लवचीकता, समर्पण, संवाद-विश्लेषण व समस्या सोडवण्याची कौशल्ये असे सगळे असावे लागते. ते सारे तात्यासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात होते, याचा प्रत्ययकारी अनुभव जनी जनार्दन वाचताना येतो. – श्री. नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय)