-
So I (सो आय)
सो आय...' ही रहस्यमय कादंबरी एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या अत्यंत नियोजित खुनाच्या तपासात वाचकाला गुंगवून ठेवते. तपासाची सुई वेगवेगळ्या पण संबंधित व्यक्तींकडे वळते, तेव्हा सामान्यपणे संशय त्याच व्यक्तीबाबत बळावतो. तीच व्यक्ती हा खून करू शकते अशी खात्री पटू लागते, नव्हे पटते. कादंबरी जेव्हा अंतिम वळणावर येते तेव्हा तपासाचा वेग वाढतो. वाचकाच्या काळजाचे ठोकेही वाढतात, कथेतला गुंताही वाढतो... आणि जेव्हा उकल होते तेव्हा..... रहस्यमय कादंबरी मराठी साहित्यात अभावाने वाचायला मिळते. बाबा कदम, सुहास शिरवळकर या दिग्गजांच्या पिढीनंतर श्री. मकरंद विनायक सापटणेकर यांची या पद्धतीची साहित्यकृती हाताळण्याची हातोटी खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी पदार्पणातच जर या क्षमतेची रहस्यमय कादंबरी लिहिली आहे तर त्यांच्या भविष्यातल्या लेखनाबद्दल खूप अपेक्षा ठेवण्याची मराठी वाचकाची मानसिकता होते यात काहीही नवल नाही. श्री. सापटणेकर यांच्या भविष्यातल्या प्रत्येकच साहित्यनिर्मितीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा! त्यांच्या साहित्यनिर्मितीस मराठी वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळेल आणि त्यांनाही वाचकांचे प्रेम लाभेल यात शंका नाही. - संतोष हुदलीकर