-
Suranchi Samaradnee : Lata Mangeshkar (सुरांची सम्राज्ञी : लता मंगेशकर)
लताचा आवाज ‘पल्याडच्या' दुनियेशी आपलं नातं जोडील अशा विलक्षण मधुर ताकदीचा होता. संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, तिच्या सुरांनी. एकेका स्वराचा, लयीचा, तालाचा आनंद घेत आणि मुक्तहस्तांनी आनंद वाटून देत आली लताची गाणी.. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना कुणाला व्याख्या करता आली, ना तो संगीताच्या कुठल्या गणिती मोजपट्टीत किंवा व्याकरणात बसवता आला. त्या अपूर्व स्वरलेण्याला ही विनम्र आदरांजली, लताबाईंच्याच निवडक पंचवीस गीतांच्या शब्द-सूर-अर्थ-आस्वादाच्या साथीने..
-
Navrasancha Jadugar Mohammad Rafi (नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी)
मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार ! संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण... क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधाही आहे...
-
Afsana Likh Rahi Hoo (अफ़साना लिख रही हूँ)
एक जमाना होता जेव्हा हिंदी चित्रपटांत ‘गाणी’ हा एक अविभाज्य घटक असे. काही चित्रपटांतील काही गाणी तर कथानक पुढे नेण्याचा भार उचलत… कथानकाचा भागच जणू! अशी गीतं रचताना, ती संगीतबद्ध करताना व ती चित्रित करताना त्यात कथेचं प्रतिबिंब पडेल असं पाहिलं जाई. चित्रपटसंगीताच्या अभ्यासिका डॉ. मृदुला दाढे यांनी या पुस्तकात आपल्या भावविश्वात अढळपद मिळवलेल्या अशा १५ चित्रपटांची निवड केली आहे. त्या चित्रपटांच्या कथेला समर्थ जोड देणाऱ्या गीतांचं चित्रपटातलं स्थान, त्यांची सौंदर्यस्थळं, त्यांची सांगीतिक बलस्थानं डॉ. मृदुला यांनी पारखी नजरेने पुस्तकात उलगडून दाखवली आहेत. गीतकाराची तरलता, संगीतकाराची सर्जनशीलता अनेक ‘अफसाने’ या रसग्रहणात आढळत जातील. चित्रपट कथानक आणि गाणी यांच्यातील मेळ उलगडणारं… अफ़साना लिख रही हूँ!