-
Osarlele Vadal (ओसरलेले वादळ)
आपल्या मनोविश्वात अशी गर्दी करणाऱ्या सगळ्याच माणसांच्या स्मरणखुणा राहत नाहीत. काहींची मिथकेच असतात. काहींचे फक्त गूढ, तर काहींचा शतकानुशतके प्रभाव. ज्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ वाचलेली नाही त्यांच्यावरही ज्ञानेश्वरांचा अप्रत्यक्ष संस्कार होतो. ज्यांनी शेक्सपिअरची नाटके वाचलेली नाहीत, त्यांनाही शेक्सपिअरबद्दल कुतूहल असते. ज्यांनी कार्ल मार्क्स किंवा सिग्मंड फ्रॉइड यांच्या विचारांचा अभ्यास केलेला नाही, त्यांनाही त्यांचा प्रभाव असल्याचे भासत राहते. ज्यांना आपण प्रत्यक्ष पाहतो वा ज्यांच्या प्रभावाखाली थेट येतो त्यांचे अनेक कंगोरे आपल्याला कळतात. काहींच्या मर्यादा लक्षात येतात, तर काहींचे अथांगपण जाणवते. पत्रकारांवर एक सांस्कृतिक जबाबदारी असते. समाजावर प्रभाव टाकणाऱ्या अशा काही माणसांची भेट वाचकांबरोबर घडवून आणणे हे त्यांचे एक कर्तव्य असते. ही भेट कधी मृत्युलेखाद्वारे घडवायची असते, तर कधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने. कधी एखादा पुरस्कार मिळाला म्हणून तर कधी त्यांच्या साहित्यकृतीचा गौरव होतो म्हणून. या माणसांनी आपल्या मनात वादळे उत्पन्न केलेली असतात. त्या वादळांनी आपल्या मनात झालेली उलथापालथ आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देते. कधी आपल्या मनात नाही, पण समाजात त्यांनी घडवून आणलेली उलथापालथ इतिहास घडवून जाते. ती वादळे ओसरल्यानंतर आपल्याला त्यांचा प्रभाव वेगळ्या प्रकारे जाणवू लागतो. आपल्या मनात वा समाजात ते झंझावात चालू असतात, तेव्हा त्यांचा वेग व व्याप्ती लक्षात येत नाही. आपण स्वतःला सावरून घेत असतो म्हणून किंवा उन्मळून पडतो म्हणून. या पुस्तकात अशा वादळी माणसांवर मी लिहिलेले लेख-अग्रलेख संग्रहित केले आहेत. ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये मी संपादक असताना लिहिलेले आहेत. काही अग्रलेख मी ‘लोकमत’चा संपादक असताना लिहिलेले आहेत. वृत्तपत्रीय लेखनाला दोन मर्यादा असतात. पहिली जागेची आणि दुसरी वेळेची. दीड-दोन तासांत आणि मर्यादित शब्दांत त्या माणसांची ओळख वाचकाला करून द्यायची असते. ती ओळख अर्थातच पूर्ण नसते. आपण पूर्णपणे तसे कुणालाच ओळखत नाही आणि तरीही अशी माणसे आपल्या मनाचा व जीवनाचा ठाव घेतात. तो ठाव वाचकांपर्यंत नेण्याचा हा एक प्रयत्न.
-
Monalisache Smit (मोनालिसाचे स्मित)
राजकारण! प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्याला वेढून राहिलेला विषय. राजकारणाशिवाय सामाजिक जीवन असूच शकत नाही. मग कोणला त्यात रुची असो अथवा नसो. प्रत्येकाचे राजकीय मत हे असतेच. लोकांची ही मते स्वानुभवावरून, टीव्हीवरील बातम्यांवरून, वृत्तपत्रातील लेख- अग्रलेखांवरून बनत असतात. इतर कोणत्याही माध्यमापेक्षा वृत्तपत्रातील लेख- अग्रलेखांमधून तत्कालीन राजकीय घटनांचे विस्तृत विश्लेषण केले जाते. या लेखांमधून राजकीय व्यक्तींचे शह-प्रतिशह, डावपेच यांचे दर्शन तसेच राजकीय घटनांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिणामांबद्दलच्या परखड विचारांचे प्रकटीकरण होत असते. राजकीय घटनांचा, व्यक्तींचा शोध म्हणजे आपल्या सामाजिकतेचा शोध. वृत्तीप्रवृत्तींचा शोध. असा शोध घेणारे हे काही राजकीय विषयांवरील, व्यक्तींवरील विचारप्रवर्तक लेख. काही लेखांना तत्कालीन परिस्थितीचे संदर्भ आहेत. काही लेखातून राजकीय धुळवडीचे विषण्ण करणारे चित्रण आहे. तर काही लेखांतून मोनालिसाच्या स्मिताप्रमाणे गूढतेचे धुके दाट झाले आहे. आजकालच्या पुढच्या पायरीवरून या घटनांकडे, व्यक्तींकडे पाहताना या लेखांमधील विचारमंथन वाचकांना अंतर्मुख करेल.