-
Vyatha Katha (व्यथा कथा)
संभ्रमाचे सांगाती' या पुस्तकाच्या निमित्तानं डॉ. नंदू मुलमुले यांची 'लेखक' म्हणून ओळख झाली आणि मी त्यांच्या लिखाणाच्या अक्षरशः प्रेमात पडलो. एकाच वेळी बुद्धीलाही पटतंय आणि हृदयालाही भिडतंय, विचारप्रवृत्तही करतंय आणि अंतर्मुखही करतंय असा तो क्वचितच येणारा विलक्षण अनुभव. या भारावण्यातूनच पुढे 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा जन्म झाला. 'व्यथा-कथा' या त्यांच्या दुसऱ्या संग्रहातल्या कथाही तितक्याच कसदार व्हाव्यात ही गोष्ट त्यांच्या अनुभवाची समृद्धता आणि प्रतिभेची संपन्नता दर्शवते. शास्त्रीय बैठकीचा कणा असलेल्या या लेखनाला कथेचा आत्मा आणि 'व्यक्तिचित्रणाचा' चं शरीर आहे. या कथा 'माणूसकेंद्री' आहेत. आजारामागच्या लोभस माणसाचं ते त्याच्या भोवतालासकट दर्शन घडवतात. 'आजाराची लक्षणं' आणि 'स्वभावाची वैशिष्ट्यं' यांची थक्क करणारी सरमिसळ ते आपल्यासमोर ठेवतात. 'एकाकीपणा', 'भयातिरेक', ‘असुरक्षितता’,‘विस्मृती', 'संशयग्रस्तता', 'छिन्नमानस', अशा मानवी व्यथा मांडतानाही ते वाचकाला 'व्यथित' करीत नाहीत तर उलट जागृतीची, साक्षात्काराची अनुभूती देतात. लेखक मानसतज्ज्ञ असला तरी 'तज्ज्ञपणा'च्या ओझ्यापासून या कथा मुक्त आहेत. म्हणूनच ते मानसिक आजारावरचं शुष्क लेखन न होता मानवी भावभावनांचा तो रसरशीत ऐवज होतो. डॉक्टरांच्या लेखनात लालित्य आहे, चिंतनाचं सार आहे, शैलीत सामाजिक उपहास टिपणारा मिश्कीलपणा आहे, भाषेत लवचिकता आणि बहुभाषिक सजगता आहे, विषयात वैविध्य आहे. मांडणीत उत्कंठा, दृष्टीत नावीन्य आहे आणि या सगळ्यांतून खळाळत वाहणारा अनुभव आणि ज्ञानाचा अखंड स्रोत आहे. - प्रशांत दळवी ज्येष्ठ नाटककार