-
Nani Palkhiwala (नानी पालखीवाला)
नानी पालखीवाला : एक सहृदयी, सुसंस्कृत वकील' हे पुस्तक नानी पालखीवाला यांच्या जीवनावर आधारित आहे. ते त्यांच्या जीवनाचे विविध पैलू आपणास दाखवते. या पुस्तकाचे हस्तलिखित वाचताना प्रकर्षाने जाणवले, की पुस्तकाचा आशय खूप विस्तृत व अंतरंगाला भिडणारा आहे. हे पुस्तक ॲड. विजय गोखले यांनी मोठ्या प्रयासाने, अभ्यासपूर्ण असे लिहिलेले आहे व मोठ्या खुबीने वाचकांसमोर मांडलेले आहे. नानाभॉय आर्देशीर पालखीवाला ह्यांना सर्व नानी पालखीवाला या नावाने ओळखतात. पुस्तकाचे नावच त्यातील आशय दर्शवते. नानी पालखीवाला यांच्या स्वभावातील व आयुष्यातील वेगळे पैलू लेखकाने वाचकांच्या समोर समर्पकपणे मांडले आहेत. 'नानी पालखीवाला ही परमेश्वराने भारताला दिलेली देणगी आहे' हे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी काढलेले उद्गार यथोचित आहेत. नानी पालखीवाला यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. ते कायदेपंडित तर होतेच, शिवाय एक निष्णात अर्थतज्ज्ञ, करतज्ज्ञ व उत्कृष्ट वक्ते होते. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व हे वादातीत व असामान्य होते. ही असामान्यता त्यांना मिळालेली जन्मजात किंवा निसर्गदत्त देणगी नव्हती तर त्यांनी प्रचंड मेहनत व प्रयत्न यांच्या साहाय्याने ती विकसित केली होती. लहानपणापासूनच ते महत्त्वाकांक्षी होते व एखादे काम करायचे ठरवल्यास ते यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा ध्यास घेत व ते पूर्ण झाल्यावरच स्वस्थ बसत. त्यांना लहान-पणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. विविध विषयांवरील पुस्तके ते वाचत असत. त्यांच्या वाचनछंदाच्या अनेक मार्मिक गोष्टी व किस्से लेखकाने या पुस्तकात उद्धृत केले आहेत.
-
Bharat Chin Sambandhanchi Pradirgh Kheli (भारत चीन
चीनच्या धूर्त धोरणीपणामुळे शिष्टाईच्या प्रांतात भारत चीनकडे – विशेषतः १९६२च्या युद्धानंतर संशयाच्या नजरेने पाहत आला आहे. असं असूनही या उभय देशांच्या संबंधांचं सखोल आकलन फार कमी वेळा मांडण्यात आलं. काही घटना-प्रसंगांमुळे तत्कालीन चर्चा-वादविवाद झाले, अजूनही ते होत असतात, पण त्याच्या खोलात फारसं कुणी जात नाही. भारताचे माजी परराष्ट्र सचिव तसंच चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेल्या विजय गोखले यांनी या पुस्तकात उभय देशांमध्ये झालेल्या वाटाघाटींचा, त्यामधील बदलांचा वेध घेतला आहे. भारत-चीन यांच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजपर्यंत सहा महत्त्वाच्या वाटाघाटींच्या खेळ्या झाल्या. या प्रदीर्घ वाटाघाटींच्या परिप्रेक्ष्यातून भारत-चीन संबंधांचा चिकित्सक ऊहापोह ते करतात, तसंच सद्यस्थितीकडेही पाहतात. भारताशी शिष्टाईच्या पातळीवर वाटाघाटी करताना चीन कोणते डावपेच आखतो, कोणत्या क्लृप्त्या लढवतो आणि कोणती साधनं वापरतो, याचा शोध गोखले पुस्तकात घेतात. त्याचा फायदा पुढील काळातील वाटाघाटींमध्ये भारतीय अधिकाऱ्यांना व्हावा, तसंच नागरिकांमध्ये या विषयाबद्दल जनजागृती व्हावी, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. सातत्याने बदलणाऱ्या भारत-चीन संबंधांचा विश्लेषणात्मक मागोवा घेणारं पुस्तक… भारत-चीन संबंधांची प्रदीर्घ खेळी