-
Bhalya Dilacha Manus (भल्या दिलाचा माणूस)
सातेक वर्षांच्या बिट्टूच्या घरी एक दिवस अनोळखी पाहुणा अवतरतो. भारदस्त शरीरयष्टी आणि डोक्यावर रूबाबदार हॅट असणारा घोडेस्वार (शेन) बिट्टूच्या घरच्या पाहुणचाराने जणू कुटुंबाचा सदस्यच होऊन जातो. पण तरीही त्याच्याभोवतीचं गूढ वलय तसंच असतं. हा पाहुणा त्या घरच्या सुखदु:खांसोबत तिथली संकटंही स्वत:च्या खांद्यावर पेलतो. बिट्टूच्या कुटुंबाच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्या जमीनदाराची त्या कुटुंबप्रमुखावर मारेकरी घालण्याची योजना तो हाणून पाडतो आणि त्या जमीनदारालाही संपवतो. बिट्टूसोबत तर त्याचं खास जिवाभावाचं नातं जडतं. अभिजात अमेरिकन साहित्यातील सर्वांत रोमॅन्टिक हिरो ठरलेला हा शेन आणि बिट्टूच्या कुटुंबाच्या नितळ स्नेहाची ही हृद्य कहाणी... मनाला भिडणारी.
-
Devachi Manse (देवाची माणसे)
फादर लतूर आणि फादर जोसेफ व्हेलट यांच्या आयुष्यावर आधारित कादंबरी आहे ‘देवाची माणसे.’ न्यू मॅक्सिको इथं खिश्चन धर्माच्या प्रसारासाठी मुख्य बिशप यांनी निवडलेला फादर लतूर सँता फेला फादर जोसेफ व्हेलटसोबत पोहोचल्यावर तिथले धर्मगुरू त्याचा अधिकार मानण्यास नकार देतात. ड्युरँगोच्या धर्मगुरूंच्या अखत्यारीतील या चर्चला फादर लतूरच्या निवडीची अधिकारपत्रेच पोहोचलेली नसतात. तीन सहस्त्र मैलांचा प्रवास करून फादर लतूर ड्युरँगोच्या बिशपला भेटायला जातात. अधिकारपत्रे मिळवून पंधराशे मैलांचा प्रवास करून सँता फेला परत येतात. तोपर्यंत फादर जोसेफ व्हेलटनं स्थानिक चर्च अधिकाऱ्यांची मर्जी संपादन केलेली असते. त्यामुळे कोणताही वैरभाव न ठेवता फादर लतूरचं स्वागत होतं. धर्मप्रसाराच्या कामाबरोबरच तो सँता फेमध्ये नवं चर्च उभारण्याचं कामही हाती घेतो. या दोन धर्मगुरूंचं काम आणि नव्या वातावरणाशी जुळवून घेतानाचा संघर्ष या कादंबरीतून प्रत्ययास येतो.
-
Aage Badho (आगे बढो)
नॅट अर्थात बो-डिचची ही जीवनकहाणी. लहानपणापासूनच गणित विषयाच्या आवडीमुळे त्याच्यात हार्वर्ड विद्यापीठात शिकून पदवी मिळवण्याची इच्छा रूजलेली. पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला शाळा सोडावी लागते. जहाजावर हिशेबनीस म्हणून काम करताना सागरी प्रवासाच्या अनुभवविश्वाशी नॅटची ओळख होते. या प्रवासात त्यानं मिळवलेलं ज्ञान आणि त्याची अपार इच्छाशक्ती त्याला त्याच्या इच्छित साध्यापर्यंत पोहोचवते. नौकानयन शास्त्रात नॅटनं केलेल्या विलक्षण कामाचा हा एक अर्थी साहित्यिक दस्ताऐवजच होय.
-
Kadambari Don (कादंबरी दोन )
’शहाणा राजकारणी सनदशीर राजकारणावर अविचल श्रद्धा बाळगणारा असतो. गरज पडल्यास तो दंगली व कत्तलीही घडवतो, परंतु असे काही घडविल्याच्या आरोपातून नामनिराळा राहतो. घडवणारा तो व निषेध करणारा तोच अशी दुहेरी भूमिका जो कल्पकतेने बजावतो, तोच उच्चपदी पोचतो.’ आटपाट नगरासारख्याच एका अजब नगराच्या कहाणीतून ’कादंबरी दोन’ सुरू होते. फक्त इथे उंदीर धटिंगण आणि माणसे उंदरांप्रमाणे जिवाला भिऊन जगतात. अत्यंत निष्णात शल्यविशारदानं संपूर्णपणे शवविच्छेदन करून शरीराचा कानान् कोपरा उघडून दाखवावा त्याप्रमाणे राजकारण आणि राजकारण्यांना सोलून काढणारी ही - ’कादंबरी दोन’