-
Zanzibari Masala (झांझिबारी मसाला)
झांझिबारी मसाला... आंबट, गोड, तिखट, खारट अशा सर्व चवींचं मिश्रण असणारा लज्जतदार साहित्यिक ऐवज. झांझिबारी या ऐतिहासिक बेटासोबतच जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या या खमंग कथा. यातली कित्येक पात्रं खास मराठी मातीतली, पण ती जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात रंगतदार गोष्ट गुंफत जातात. कधी कोल्हापूरचा धट्टाकट्टा मालोजी मॅटहॅटनमध्ये खंडेनवमी साजरी करतो, तर कधी पाटील पॅरिसची पोरगी पटवण्याच्या नादात भलत्याच फंदात अडकतो. या कथा कधी डच पाहुचणार घडवतात, तर कधी जपानी. त्यांचा कॅनव्हास जगातल्या भिन्न रंगी अवकाशाने व्यापलेला असला, तरी त्या तितक्याच आपल्या मातीशीही नातं सांगतात. कल्पनेचे पंख घेऊन जगाचा अवकाश अनुभवू देणाऱ्या अफलातून कथांचा हा तृप्त करणारा संग्रह.
-
Sthalantar (स्थलांतर)
युरोपला स्थलांतरित होण्याचं, तिथे एक सुस्थिर जीवन जगण्याचं स्वप्न डोळ्यांत घेऊन आफ्रिकेतील एरिट्रिया या देशातून बाहेर पडलेली सेमिरा... नंतर सुदान ते छादमधील अंजामेना असा झालेला प्रवास....अंजामेनात खिसशी झालेली भेट... दोघांत निर्माण झालेले शरीरसंबंध... त्यानंतर बोटीने इटलीला जात असताना लिबियाकडून बोट पकडली जाऊन दोन महिन्यांचा घडलेला असहनीय तुरुंगवास...तुरुंगवासात असताना लक्षात आलेलं गरोदरपण...तुरुंगातून सुटल्यावर परत अंजामेनाला गेली असताना खिसने फसवणूक केल्याचं कळलेलं सत्य...तिथेच निर्वासित कार्यालयाच्या निवासात राहत असताना जडलेला स्मृतिभ्रंशाचा आजार... तिची रुग्णालयात झालेली रवानगी...अशातच तिने मुलीला दिलेला जन्म...मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांनी रुग्णालयातून केलेलं पलायन...निर्वासित कार्यालयाच्या अधिकारी रेमा बुस्तानी आणि तिच्या भावाने तिच्या शोधासाठी केलेले अथक प्रयत्न...नाट्यमय वळणांनी पुढे सरकत राहणारी सेमिराची सत्यकथा ‘स्थलांतर.’
-
Drushtipalikadil Srushti (दृष्टीपलीकडील सृष्टी)
आफ्रिका - एक अगम्य आणि अदभूत खंड! तेथील शतकानुशतके हिंसाचाराने व अत्याचाराने गांजलेली नि गूढ चालीरीतींच्या दुष्ट चक्रात गुरफटलेली. आजही तेथील कित्येक रहिवाशांचा चेटूक, करणी,पिशाच्चबाधा मंत्र-तंत्र,जादूटोणा नि चमत्कार यांच्यावर विश्वास आहे व त्यामुळे ते कर्मकांड व बुवाबाजीच्या आहारी गेले आहेत, हे लेखकास सहा वर्षांपूर्वी आफ्रिकेत स्थलांतर केल्यानंतर प्रकर्षाने जाणवले. 'दृष्टीपालीकडील सृष्टी' मध्ये आहेत आफ्रिकेतील अमानुष विळख्याची व्याप्ती आणि निष्पत्ती सिद्ध करणाऱ्या बारा मनोरंजक सत्यकथा. त्यातील काही आहेत चकित नि अस्वस्थ करणाऱ्या तर काही भयावह नि अंगावर शहरे आणणाऱ्या. त्यांच्या माध्यमातून लेखकाने आफ्रिकी मानसिकतेचा शोध घेतला आहे व तो सध्या, सोप्या नि उत्कंठावर्धक शैलीत सदर केला आहे. अंधश्रद्धांनी निर्मिलेली मानसिक गुलामगिरी - मग ती जगाच्या कोणत्याही भागातील असो - कशी समाजविघातक असते हे या संग्रहातील बहुतेक सार्या कथांचे सूत्र आहे. सर्वसाधारण मराठी माणसाच्या दृष्टीपालीकडील हि अज्ञात आणि अनोखी सृष्टी पाहिल्यानंतर आपल्या सभोवतीच्या समाजातील आंधश्रद्धांचे निर्मुलन करणाऱ्या चळवळीच्या कार्याची महानता व त्याचे महत्व सुस्पष्ट व्हावे अशी लेखकाची अपेक्षा आहे.