-
Kramashaha
खानावळीत राहाणारा, सायकल वापरणारा आणि मनातल्या मनात सतत काही लिहीत राहणारा कुणी एक बाबू असतो आणि त्याचे खानावळीचे बील थकते म्हणून त्या खानावळवाल्यानेच चालवलेल्या एका पाक्षिकात क्रमश: एक कादंबरी लिहीत लिहीत तो ते बील भागवतो. तर ही क्रमश: कादंबरी लिहिणे आणि त्याची प्रक्रिया उलगडणारे त्या नायकाचे प्रथमपुरुषी निवेदन, त्या कादंबरीला येणारी नमुनेदार प्रतिक्रियात्मक पत्रे, त्या क्रमश: कादंबरीतील काही पात्रांच्या चर्चा असे या कादंबरीचे काहीसे गुंतागुंतीचे स्वरूप आहे. वास्तवातले वास्तव आणि साहित्यकृतीमधले वास्तव यातली सरमिसळ करण्याचे प्रयोगही आहेत. सुरुवातीला चक्रावून टाकणारी, नंतर गुंतवून टाकणारी आणि शेवटी अस्वस्थ करणारी अशी ही कादंबरी आहे. प्रभावी आणि प्रयोगशील असणारे केळुसकरांचे कादंबरीलेखन दाट आशयाने आणि चिंतनशीलतेने उत्तरोत्तर अधिक समर्थ होत जावे.