-
Icon (आयकॉन)
बलाढ्य रशिया अराजकतेच्या चक्रात सापडतो. समाजजीवन गढूळ होते. जनता दु:खसागरात लोटली जाते. अशा भावूक स्थितीत देशाला तरून नेणारा तारणहार नेता-‘इगॉर कोमारोव्ह’ समोर येतो. कोमारोव्हची प्रभावी भाषणे, आत्मीयता पाहून, योग्य नेता मिळाल्याचा आनंद रशियन जनतेला होतो. रशियाचा सुवर्णकाळ आता दूर नाही, असे स्वप्न लोक पाहतात... आणि एकदमच रहस्यमय, ‘काळ्या जाहीरनाम्या’ चा बोलबाला होतो. कोमारोव्हने गुप्तपणे लिहलेला ‘काळा जाहीरनामा’ चोरीस जातो. त्याचे हिटलरशाही राबवायचे मनसुबे कोसळतात. ‘काळा-रहस्यमय जाहीरनामा’ ब्रिटिशांच्या हाती लागतो. जाहीरनामा अनधिकृत असल्याने पाश्चात्य राष्टे कारवाई करू शकत नाहीत. पण ‘कॉन्सिल ऑफ लिंकन’ हा प्रभावी आंतरराष्ट्रीय समुदाय, अनधिकृत अस्तित्व नाकारणारा गट. हा गट ‘गुप्तहेर यंत्रणेचे-सीआयए’ चे ‘जेसन मंक’ यांची प्रतीक-आयकॉन-म्हणून निवड करतात. ही महान कामगिरी मंक यांचेवर सोपवल्याने इमॉर कोमारोव्हचे दुष्ट मनोरे गळून पडतात. जेसन मंक त्याची कृष्णकृत्ये शोधून ती धुडकावून लावतात. कोमारोव्हचा पर्दापाश होऊन हिटलरशाहीला पायबंद बसतो, हे ‘आयकॉन’ ही कादंबरी सांगते.
-
The Prodigal Daughter (द प्रॉडिगल डॉटर)
फ्लोरेंटिनानं लहान वयातच स्वप्न पाहिलेलं असतं अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष होण्याचं...त्या दृष्टीने तिची गव्हर्नेस मिस ट्रेडगोल्ड तिला घडवते...फ्लोरेंटिना आणि रिचर्ड परस्परांच्या प्रेमात पडतात आणि विवाहबद्ध होतात... दोन मुलं होतात त्यांना...फ्लोरेंटिना एक उद्योजिका म्हणून आणि रिचर्ड एक बँकर म्हणून यशाचं शिखर गाठतात...आणि मग फ्लोरेंटिनाचा शाळासोबती एडवर्ड तिला राजकारणात येण्यास प्रवृत्त करतो...ती काँग्रेस सदस्य होते...नंतर सिनेटर होते... तिची लोकप्रियता वाढते...राजकारणातील ओंगळपणाचं दर्शन तिला होतं...तरीही राष्ट्राध्यक्ष पदाच्या दिशेने ती सरकत असते...रिचर्डच्या मृत्यूनंतर थांबते काही काळ...पण परत सक्रिय होते...राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेण्याच्या अटीवर पीट पार्किन तिला आधी उपाध्यक्ष आणि नंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करण्याचं आश्वासन देतो... काय होतं पुढे? दोन घराण्यांचं वैर, प्रेमाचा वसंत आणि राजकीय पटाच्या पार्श्वभूमीवर रंगलेली एका महत्त्वाकांक्षी स्त्रीची जबरदस्त कहाणी.
-
Twelve Red Herrings (ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज).
तुरुंगात खितपत पडलेल्या एका कैद्याची खात्री असते की, ज्याच्या खुनाचा त्याच्यावर आरोप आहे, तो माणूस जिवंत आहे... एक चंचल सुंदरी चतुराईनं नवरा आणि नवीन धनिक सावजाकडून वाढदिवसाची भेट मिळवते... वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नौकानयनपटूने बोटक्लब हाउसला भेट म्हणून दिलेल्या ऐतिहासिक वस्तूचीच चोरी होते... कथा-कादंबरी लेखकाला स्तंभलेखन करणारा त्याचा मित्र भोजनादरम्यान जी कल्पना ऐकवतो त्यावर लेखकाने आधीच कादंबरी लिहिलेली असते... एक धोकादायक वाटणारा माणूस एका महिला-ड्रायव्हरचा हायवेवर पाठलाग करतो... एका तरुण कलावतीला आयुष्यातली सर्वांत मोठी संधी मिळते... चतुर मांडणी, अनोखी व्यक्तिमत्त्वं, कल्पक कथानक आणि अनपेक्षित शेवट असलेल्या बारा कथांचा संग्रह ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज.’