-
Fifty Shades of Grey (फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे)
‘फिफ्टिी शेड्स ऑफ ग्रे’ ही अॅनेस्टेशिया (अॅना) स्टील आणि खिश्चन ग्रे यांची कथा आहे. अॅनाची पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेली मैत्रीण केट, अॅनाला एकदा प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या खिश्चन ग्रेची मुलाखत घ्यायला पाठवते. पहिल्याच भेटीत खिश्चन आणि अॅना एकमेकांच्या प्रेमात पडतात; पण अॅना थोडीशी लाजरी असल्यामुळे आपल्या मनातली ग्रेविषयीची प्रेमभावना स्वीकारायला संकोचत असते; पण ग्रेच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे ती त्या प्रेमभावनेला रोखू शकत नाही आणि ग्रेच्या प्रेमप्रस्तावाला होकार भरते. कौमार्य अबाधित असलेल्या अॅनाला खिश्चन शरीरसंबंधाचे धडे द्यायला लागतो; मात्र कामक्रीडा करताना त्याच्या काही अटी असतात. त्या अॅनाला जाचक वाटायला लागतात आणि हळूहळू त्यांच्यात दुरावा निर्माण व्हायला लागतो. शेवटी ते वेगळं व्हायचं ठरवतात. एक यशस्वी उद्योजक आणि चांगला माणूस असलेला ग्रे कामक्रीडेच्या वेळी विकृत होतो. त्याच्यातला माणूस आणि त्याच्यातला कामविकृत पुरुष यांच्यातील द्वंद्व अॅनाला अस्वस्थ करत असतं. ते द्वंद्व जाणून घेण्यासाठी ‘फिफ्टिी शेड्स ऑफ ग्रे’ वाचलंच पाहिजे.
-
A Russian Diary
ब्लादिमीर पुतिनच्या राजवटीतल्या, घायाळ करणार्या आणि हादरवून टाकणार्या सत्यांना अॅना पोलितकोवस्क्याने तिच्या आधीच्या आणि या डायरीत ज्या प्रकारे उघड केलं आहे, त्यावरून तिला केव्हाना केव्हा कोणीतरी मारून टाकणारच होतं आणि एका प्रकारे ती एवढे दिवस जगली, हाच एक चमत्कार म्हणावा लागेल! सर्वात आश्चर्यकारक गोष्ट तर ही म्हणावी लागेल की, सोव्हिएतनंतरच्या अस्थिरतेच्या काळात एक अशी पत्रकार उभी राहिली, जिने जवळजवळ एकहाती चेचन्याची कुप्रसिद्ध दु:खान्तिका, तसंच आधुनिक रशियाची गैरकृत्यं जगाच्या नजरेसमोर आणली. राजकीय आणि मानवी हक्कांची व्यवस्थेतच मोठ्या प्रमाणावर घडून आलेली पायमल्ली, याचा तिने बुरखा फाडला आणि 'रशियन डायरी'त केलेल्या नोंदीतून तिने ते काम सुरूच ठेवलं. हीच ती डायरी, डिसेंबर 2003 ते 2005च्या अखेरपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पार्लमेंटरी निवडणुका आणि बेसलानच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर उठलेला गदारोळ यांच्या नोंदी ठेवणारी! अॅना पोलितकोवस्क्याला जगू देण्यात आलं नसतं, याची जणूकाही भविष्यवाणीच तिची 'ए रशियन डायरी' वाचताना झाल्यासारखी भासते. तिच्या मॉस्को येथील अपार्टमेंट ब्लॉकच्या जिन्यात, सुपारी घेऊन एका भाडोत्री मारेकर्याने केलेली तिची भयानक हत्या घडल्याचं तुम्हाला ठाऊक असल्याने तिचा हा शेवट अटळ होता, हे प्रकर्षाने जाणवतं.
-
Piece Of Cake
वय वर्षे 13 : 'बाटा'च्या दुकानात 'मेन्स सेक्शन'मध्ये बुटांची खरेदी. वय वर्षे 15 : दातांना हिरव्या रंगाच्या ब्रेसेस आणि डोळ्यांना चष्मा असलेल्या मुलानं मैत्री सोडली. वय वर्षे 26 : नेभळट जग्गू 'बॉस' म्हणून मिळाला. वय वर्षे 29 : 'हिंदुस्थान टाइम्स'च्या 'विवाह विषयक' जाहिरातीत 'किरकोळ' विभागात प्रथमच आलेली छोटी जाहिरात. मीनल शर्मा, एमबीए, वय वर्षं एकोणतीस, उंची पाच फूट दहा इंच; जरा अधिकच कार्यान्वित झालेली सदसद्विवेकबुद्धी आणि ऐटबाजपणा. मीनलला सगळं काही पाहिजे. इंटरनॅशनल फूड्समध्ये यशस्वी 'करिअर', करिअरला जुळणारी जीवनपद्धती आणि एक 'कूल' तरुण, जो तिला हि-यांचे दागिने देईल, फुलं देऊन स्वागत करेल आणि तिच्या विनोदांना हसून दाद देईल, असा. पण तिच्या आयुष्यात आत्तापर्यंत घडलेल्या ओशाळवाणं करणा-या घटनांकडे नजर टाकली, तर हे सगळं तेवढं साधंसोपं नाही हे लक्षात येतं. विशेषत: जेव्हा तिच्या आईनंच तिचं लग्न जमवायला पुढाकार घेतलाय आणि मीनलला आता आयुष्याचा जोडीदार निवडताना एक तल्लख पण कंटाळवाणा कॅन्सर स्पेशालिस्ट आणि वादळी व्यक्तिमत्त्वाचा 'सेक्सी' रेडिओ जॉकी हे दोन पर्याय आहेत. भरीत भर म्हणून तिचा एक खोडसाळ बालमित्र आहे, आता तिचा सहकारी, जो तिचं 'करिअर' बरबाद करण्याची संधी दवडू इच्छित नाही. खोडकरपणानं भरलेली ताजीतवानी कथावस्तू वाचकाला प्रफुल्लित करत उत्सुकतेनं पानं उलटवीत ठेवते, पुस्तक वाचून पुरं होईपर्यंत...