-
So Cool Tek 2 (सो कूल टेक २)
सोनाली कुलकर्णी एक गुणी अभिनेत्री आहे.. या विधानानंतर स्वल्पविराम येत नाही, अर्धविराम किंवा पूर्णविरामही नाही.. येतात ती दोन टिंबं.. दोन टिंबं ही सोनालीची नुसती लेखनशैली नाही, तर ओळख आहे ! तिच्या लिखाणाला पूर्णविराम फारसे मंजूर नसावेत.. म्हणूनच पाठोपाठ दुसरं टिंब येत असावं.. पुढे नेणारं ! दोन टिंबांमधूनही तिला काहीतरी सांगायचं असतं.. सोनाली उघड्या डोळ्यांनी जग पाहताना माणसांना वाचते आणि शब्दांतून त्यांची व्यक्तिचित्रं रेखाटते. तिची अक्षरं वाचकांशी बोलतात.. त्या अक्षरांना लेन्स असते आणि वाचाही ! अशा संवेदनशील आणि संवादोत्सुक अभिनेत्रीला रंगभूमीवर आणि पडद्यावर पाहण्या-ऐकण्याएवढंच ‘वाचणं'ही किती लोभस असू शकतं, याचं उदाहरण म्हणजे सो कुल टेक 2
-
So Cool…. (सो कुल …)
चित्रपटाच्या चमकत्या क्षेत्रात वावरणारी माणसे आसपासच्या वास्तवाशी कितपत जोडलेली असतात, याबद्दल या क्षेत्राबाहेरील लोक काहीसे साशंकच असतात. मात्र, अभिनय क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मात्र, ही साशंकता दूर केली आहे. ती संवेदनशील अभिनेत्री आहेच, शिवाय ती एक संवेदनशील लेखिकाही आहे, हा समज तिच्या या पुस्तकाने पक्का होतो. या पुस्तकातील छोटेखानी लेखांमधून तिने चित्रपट क्षेत्रातील अनेक अनुभव सांगितले आहेत; तसेच आसपासच्या व्यक्ती, प्रसंग, घटनांकडे चिंतनशील दृष्टीने पाहिलेली दिसते. स्ट्रेस, मैत्री, स्त्री असणे, निसर्ग, संगीत, वाढदिवस, एसएमएस, फॅशन आदी अनेक विषयांवर केलेले लेखन आहे. केवळ अभिनयाकडेच नव्हे, तर एकंदरीत आयुष्याकडेही गंभीरपणे पाहणाऱ्या या देखण्या, सुसंस्कृत अभिनेत्रीचा मनमोकळा संवाद! स्वत:शी आणि वाचकांशीही...