-
Kanvinde Harawale (कानविंदे हरवले)
“कानविंदे हरवलेत.'' मिसेस कानविद्यांच्या या वाक्यावर मी क्षणभर काहीच न कळल्यागत त्यांच्याकडे पाहात बसलो. “आठ दिवस झाले कानविद्यांचा काही पत्ता नाही.'' मिसेस कानविंदे पुढे म्हणाल्या आणि मी हातातला चहाचा कप समोरच्या टीपॉयवर ठेवला. मिसेस कानविद्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ लागल्यावर माझ्या मनात अनेक विचार फास्ट फॉरवर्ड केलेल्या चित्रमालिकेप्रमाणे भरभर सरकून गेले.. कानविंदे हरवले म्हणजे नेमकं काय झालं? ते कसे आणि कुठे हरवले? आणि मुख्य म्हणजे कानविंदे हरवले याच्याशी माझा काय संबंध? मग क्षणार्धात वासुदेव कानविंदे या माणसाशी काही दिवसांपूर्वीच झालेल्या माझ्या पहिल्यावाहिल्या संवादाचा क्षण मनात चमकून गेला...
-
Gothanyatlya goshti (गोठण्यातल्या गोष्टी)
गोष्टी सांगण्यापूर्वी… ‘….प्रत्येक गावात काही आख्यायिका आणि दंतकथा असतात . एक लेखक म्हणून या आख्यायिका मला भुरळ पाडतात . कोणताही लेखक त्याच्या कानावर पडलेल्या आख्यायिका निव्वळ कपोलकल्पित प्रदेशात राहू देत नाही . कधी चिमूटभर आशयाच्या सूतावरून कल्पनेचा स्वर्ग गाठत , तर कधी आशयाच्या स्वर्गात कल्पनेचं सूत कातत या आख्यायिकांना लेखक कागदावर उतरवत राहतो . कधी कल्पनेतल्या माणसांना तो खरेखुरे सदरे चढवतो . तर कधी खऱ्या मानवी स्वभावांना लेखक कल्पित नियती देतो . नाव , गाव , देश , वेष बदलत ही माणसं , या आख्यायिका मग सर्वदूर पसरत जातात आणि चिरायू होतात . ” गोठण्यातल्या गोष्टी’तली ही माणसं खरी असली नसली तरीही जन्मापासून ही माणसं माझ्यासोबत आहेत . या माणसांना आदि – अंत नाही. म्हणूनच ही माणसं स्वयंभू आणि चिरायू आहेत …..’
-
Hakamari (हाकामारी)
ती तीनदा हाका मारते आणि जो ओ देईल त्याला घेऊन निघून जाते! हो, खरंच हाकामारी असते! खरंच असते! त्या काळ्याकुट्ट रात्री... त्याला हाक मारणारी नक्की कोण होती? संध्या? निशा? की आणखी कोणी? नेमकं काय घडलं होतं त्या रात्री? या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधता येतील? की आयुष्यभर ते त्याला टोकरत राहतील? गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी – हाकामारी!
-
Kaljugari (काळजुगारी)
काली स्वतःला आरशात पाहतो. कपाळाच्या मधोमध त्याला दिसतो जोकर! मरण्याआधी त्याच्या बाबानेच हा जोकर त्याच्या कपाळावर गोंदून जणू काही त्याच्या नशिबाचा रस्ता आखून ठेवलेला... आणि हा रस्ता जात होता कित्येक वर्षांनी होणाऱ्या काळजुगारी स्पर्धेत! जगाची व्यवस्था बदलण्याची संधी असलेल्या कालीचं नशीब या स्पर्धेत उजळेल की त्याच्या बाबासारखाच तोही नुसताच परत येईल? मराठी साहित्यातील रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालणारी लघुकादंबरी – काळजुगारी!
-
Perfectchi Bai Foldingcha Purush (परफेक्टची बाई फो
‘मनापासून पतंग उडवणाऱ्या’वर ‘परफेक्ट बाई’चं प्रेम आहे खरं, पण ती त्याच्यासोबत जाईल की तिची सव्वीसावी गोष्ट अधुरीच राहील? समस्त स्त्रीजातीला समाधान देईल असा तीळ त्याला जन्मजात लाभला असला तरी वास्तवात खरोखरीच तिळा दार उघडचा मंत्र कामी येईल? पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणाऱ्या दोन अनवट दीर्घकथा!
-
Ghanagarda (घनगर्द)
हृषिकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे. ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता. त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते. हृषिकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो. तिचे सगळे कोपरे धुंडाळतो. महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो. म्हणूनच त्याच्या कथांमध्ये एक चैतन्य सळसळताना जाणवतं. 'घनगर्द' या कथांसंग्रहामधून हृषिकेशच्या कथेने एक उंबरठा ओलांडला आहे. ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे भय आणि अदभूताचा मार्ग तिने सोडलेला नाही. मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत. त्या नेमक्या कुठे जाणार हे कोणीही सांगू शकणार नाही. पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल. याची खात्री 'घनगर्द' वाचल्यावर पटते, हे महत्वाचं
-
Danshakal (दंशकाल)
विहिरीत अंधार आहे. डोकावून पाहिलं तर भोवळ वगैरे येईल इतपत अंधार. अंधारात काहीही असू शकतं; काहीहीम्हणजे काहीही. पण ते काहीही म्हणजे नेमकं काय? हे आत उतरल्याशिवाय कळणार नाही. आजवर आयुष्यातल्या अप्रिय, असह्य, नको असणाऱ्या गोष्टी मी विहिरीत टाकल्या. अगदी अडगळीत टाकाव्या तश्या टाकल्या. पण विहीर म्हणजे अडगळ नाही. विहिरीत आई आहे, अण्णा आहेत. विहिरीत काकूचं बाळ आहे, नंदाकाका आहे. विहिरीत दमी, तायडी आणि सुपडीही आहे. विहिरीत अनेक उत्तरं आहेत. अशा प्रश्नांची उत्तरं जे प्रश्न मला कधी पडलेच नाहीत; किंवा जे प्रश्न मी स्वत:ला कधीच पाडून घेतले नाहीत; किंवा असे प्रश्न ज्यांची उत्तरं मी कधी शोधलीच नाहीत. विहीर माझ्या आयुष्याचा रहस्यभेद आहे, जो अनेकदा शक्य असूनही मी आजवर कधीही केलेला नाही. विहिरीत उतरणं हे माझं प्राक्तन नाही. विहिरीत उतरणं हा मी राजीखुशी निवडलेला एक पर्याय आहे. बाहेरच्या वास्तवाला तोंड देण्यापेक्षा विहिरीत लपून बसणं कधीही सोपंच.
-
Andharvari
प्रेम, दु:खं, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तींत चिमूटभर भीती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. या कथा अशा बदललेल्या बाजाच्या आहेत. सालंकृत भाषाशैली आणि अनोखे कथाविषय यांनी समृद्ध झालेल्या या संग्रहातील कथा एक वेगळीच उंची गाठतात. अशा कथा कधी वाचल्याच नव्हत्या असं वाटायला लावणारी, मानवी मनाच्या असंख्य काळ्याकपारींचं अज्ञात दर्शन घडविणारी, ही अंधारवारी.