-
Astitva (अस्तित्व )
सुधा मूर्ती यांच्या विवेचक लेखणीतून साकारलेली, वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कादंबरी. एका श्रीमंत,सुखवस्तू घरातल्या मुकेशची, त्याच्या अस्तित्वाची ही कहाणी. सुखी समाधानी मुकेशच्या जीवनात अचानक एक वादळ उठतं. तो कोण, कोणाचा मुलगा अशा कधीच न पडलेल्या प्रश्नांनी तो वेढला जातो. त्याचं आयुष्य पार बदलून जातं. एक बळकट कौटुंबिक बंध अचानक तुटून जातो. मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ? स्वत:च्या जन्माचा शोध घेता घेता मानवी जीवनातल्या कितीतरी अनोख्या वाटावळणांवरून त्याला जावे लागते. मुकेशच्या स्वत:च्या अस्तित्वाच्या शोधाने मानवी नातेसंबंधांवर, भारतीय कुटुंबसंस्थेच्या, संस्कारांच्या शाश्वततेवर प्रकाशझोत टाकलेला आहे. एका कुटुंबात घडलेली ही घटना भारतातल्या कुठल्याही भागात घडू शकणारी आहे. आपण भारतीय लोक वेगवेगळ्या भाषा बोलतो, वेगवेगळे रितीरिवाज पाळतो, परंतु कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले नाते अत्यंत प्रेमाचे, जिव्हाळ्याचे असल्याचे सर्वच ठिकाणी दिसून येते. भारतीयांच्या या समृद्धीची झलक या कहाणीतून दिसून येते.