-
Kathasetu (कथासेतू)
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही प्रांतांची आपापली वेगळी भाषा असली तरी त्यांच्या लोकजीवनात काही अंशी साम्यही आहे आणि म्हणूनच मराठी आणि गुजराती भाषांना 'भाषा-भगिनी' म्हणणे उचित ठरेल. भारतीय भाषांतील साहित्याचे अभिसरण होत राहावे, भारतीय संस्कृतीचा सामायिक वारसा जपण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न व्हावेत, त्यासाठी भारतीय भाषांचे आपापसात अनुवाद होऊन भाषा-भगिनींच्या अंतरंगात डोकावण्याची संधी मिळावी, यासाठी 'आंतरभारती' ही संकल्पना अस्तित्वात आली. 'कथासेतू' या कथासंग्रहाद्वारे गुजराती भाषेतील काही ख्यातनाम साहित्यिकांच्या साहित्यकृतींचे अनुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध होत आहेत. या निमित्ताने गुजराती भाषेतील जुन्या-नव्या सुप्रसिद्ध एकवीस साहित्यिकांच्या लक्षणीय साहित्यकृतींचा आस्वाद मराठी वाचकांना मिळणार आहे.
-
Eka Aparichit Gandhichi Aatmakatha (एका अपरिचित गा
नटवर गांधी यांचं हे आत्मकथन आहे. गुजरातमधल्या एका खेड्यातून मुंबईत येऊन त्यांनी बी.कॉम.पर्यंत घेतलेलं शिक्षण, ओढग्रस्तीची आर्थिक परिस्थिती, धाकट्या सहा भावंडांची जबाबदारी त्यांनी घ्यावी, अशी वडिलांची अपेक्षा, नोकरीसाठीचा संघर्ष, लग्नानंतर भाड्याच्या एका खोलीसाठी करावा लागलेला संघर्ष, तुटपुंज्या पगारात प्रपंच चालवताना होणारी असह्य ओढाताण, अशातच अमेरिकेत मित्राच्या मदतीने एम.बी.ए.साठी मिळालेला प्रवेश, एम.बी.ए.नंतर अमेरिकेत प्रोफेसरची मिळालेली नोकरी, यथावकाश अमेरिकेत स्वत:चं घर, गाडी, अपत्यांसह संपन्न जीवनाचा घेतलेला अनुभव, तेथील नोकरीचे, पीएच.डी.चे अनुभव, वॉशिंग्टन डी. सी.च्या टॅक्स विभागात कमिशनर आणि सीएफओ पदावर केलेलं महत्त्वपूर्ण काम, अमेरिका आणि भारताची विविध बाबतीत तुलना इ. बाबींतून ओघवत्या भाषेतून हे आत्मकथन उलगडत जातं. तत्कालीन मुंबई, तत्कालीन अमेरिकेचं दर्शन घडतं. अंतर्मुख करणारं प्रेरणादायक आत्मकथन.
-
Krushnam Vande Jagadgurum ( कृष्णं वन्दे जगद्गुरूम
श्रीकृष्णाच्या केवळ स्मरणाने अस्तित्वाविषयीचा अहंकार गळून पडतो. ‘कृष्णं वन्दे जगद्गुरूम!’ मधून कृष्णाचे अदृश्य दर्शनही मानवांत फार मोठा बदल घडवते, इथेच श्रीकृष्णाची थोरवी व प्रचिती मिळते. वर्तमानातल्या जगण्यातच हा कृष्ण आपलं सारथ्य करत असतो. या बदल्यात कृष्णाला काही नको असते, फक्त निखळ, निव्र्याज प्रेम व निर्लेप भक्ती हवी असते. सच्चेपण हवे असते; आणि ते त्याला मिळते. ‘महाभारता’तून जणू जीवनाचे नवरस मानवाची पाठराखण करतात. कारण–कृष्ण म्हणजे एक आदर्श आहे, पूर्णत्वाचा आदर्श! शेवटी काळ कोणताही असो, धर्म वा प्रदेश कोणताही असो, विविध काळांतल्या, धर्मांतल्या अथवा प्रदेशांतल्या अखिल मानवजातीला ईश्वराबद्दल जी एक उत्कंठा आहे, आणि जी अत्यंत उत्कट स्वरूपाची आहे, त्या उत्कंठेचा आविष्कार म्हणजेच, ‘श्रीकृष्ण’ होय.
-
Karnalok (कर्णलोक)
‘अनाथ' शब्दाची चीड असलेला बारा-चौदा वर्षांचा एक मुलगा योगायोगानं नेमका अनाथालयाशीच जोडला जातो. मी ‘त्यांच्यातला' नाही हे स्वतःला आणि जगाला बजावत असतानाच नकळत ‘त्यांच्या' सुखदुःखांशी बांधला जातो... त्याची आणि दहाव्या-बाराव्या वर्षीच त्या अनाथालयातल्या अवघ्या मुलांची आई झालेली दुर्गाई, तिची ती अनेक लहान मुलं.... तिथले कर्मचारी, संचालक, मार्गदर्शक, हितचिंतक, मुलांना दत्तक घेऊ इच्छिणारे भावी पालक यांची कहाणी...म्हणजेच ‘कर्णलोक.
-
Timirpanthi (तिमिरपंथी)
‘तिमिरपंथी’ ही कादंबरी चौर्य या कलेच्या आधारे आयुष्य कंठणाऱ्या जमातीतील कलाकारांवर बेतली आहे. पोटापाण्यासाठी गावोगावी वसती (दंगा) हलवणाऱ्या भटक्या जमातीतील मुख्यत्वे सती आणि तिच्या अनुषंगाने येणाNया व्याqक्तरेखांभोवती ही कादंबरी फिरते. ही सती उपजत कलाकार आहे. ‘ही’ कला अंगी घेऊनच ती जन्माला आली आहे. आईकडून गौरवर्णी लावण्य आणि पित्याकडून कामगिरीतलं कसब तिला लाभलं आहे. ती जिज्ञासू, चौकस आहे. धाडसी तर आहेच. समयसूचकता आणि प्रसंगावधानही तिच्याकडे आहे. ऐकलेल्या गोष्टींवर स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता तिच्यात आहे. तिची मतं तर्कसंगत असतात. वस्तीतल्या अपंग मुलीवर मायेचा पदर पसरणारा कनवाळूपणा तिच्यात आहे. शिक्षणाच्या अभावामुळे आपला समाज उपेक्षित आहे, शोषित आहे, भटका आहे, याची तिला जाणीव आहे. स्थिर समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी संस्कारक्षम शैशवात शिक्षणाची रुजुवात व्हायला पाहिजे अशी तिची धारणा होते. अशा या सतीची कहाणी वाचूनच अनुभवायला हवी.
-
Chakra Te Chrkha
कृष्ण म्हणजे मूर्तिमंत करुणा आणि गांधीजी म्हणजे साक्षात साकारलेलं अद्भुत प्रेम! गांधीजींचे जीवन म्हणजे सत्य प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे. कृष्णाचे जीवन म्हणजे सत्यप्राप्ती- नंतरचे आचरण आहे. धर्माची स्थापना हे कृष्णाचे जीवितध्येय होते; तर सत्याची प्राप्ती हे गांधीजींचे. ह्या दोघां असामान्य व्यक्तींच्या जीवनाचे अवलोकन करून झाल्यावर त्यांच्या कर्मांची मीमांसा केल्यानंतर ह्या दोघांचे उद्देश साध्य झाले, असे आपण म्हणू शकू का? ह्या प्रश्र्नाचे छातीठोकपणे होकारार्थी उत्तर देणे अवघड आहे. … आणि तरीही कृष्णाविना आणि गांधींविना आपल्या देशाचेच काय, सगळ्या जगाचेही; किंबहुना समग्र मानवजातीचेही चालले नाही! चालणार नाही. कृष्ण आणि गांधी ही अशी दोन प्रतीके आहेत की त्यांच्या स्पर्शाविना मानवजातीचा उद्धार होणे शक्य नाही. काळ पुढे जात राहिला आणि मधून मधून अशी प्रतीके मानवजातीला लाभत राहिली हे मानवजातीचे भाग्य होय! ज्या क्षणी मानवजात अशी प्रतीके निर्माण करण्याची क्षमता हरवून बसेल तो क्षण इतिहासाचा अंतिम क्षण असेल!