-
Te 127 Taas (ते १२७ तास !)
अॅरन हा साहसी गिर्यारोहक एकदा कॅन्यनलँड्स या वाळवंटात गिर्यारोहणासाठी गेलेला असताना एका दगडाखाली अडकतो. त्याचा उजवा हात मनगटापासून कोपरापर्यंत चिरला जातो. त्याचा तो जखमी हात दगडाखाली अडकतो. जवळ मोजकंच खाद्य आणि पाणी...अशा परिस्थितीत सुरू होतो वेदनामय संघर्ष...त्या दगडापासून हात सोडवण्यासाठी त्याचे चालू असेलेले विविध प्रयत्न... पूर्वी केलेल्या साहसी मोहिमांच्या मनात दाटलेल्या आठवणी... एका बाजूला प्रचंड वेदना... जवळ असलेल्या व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे आपल्या प्रियजनांबद्दल व्यक्त केलेल्या भावना... अॅरनच्या वेदनामय संघर्षाची थरारक, हलवून सोडणारी कहाणी ‘ते १२७ तास...’
-
Politics of the Womb (पॉलिटिक्स ऑफ द वूम्ब)
आयुष्यात आपण स्वतंत्रपणे काही निर्णय घ्यायचे असतात. त्या निर्णयांपैकी एक असतो, आपण मूल जन्माला घालायचं की नाही. आणि तरीही, ज्यांना मूल जन्माला घालायचं असतं, पण तसं करण्यासाठी ते नैर्सिगकरीत्या असफल ठरतात, अशा लोकांवर वंध्य असण्याचा क्रूर शिक्का लावला जातो. समाज या लोकांना टोचून बोलतो; त्यांच्यात काहीतरी कमी आहे, असं त्यांना सतत सांगत राहतो. मग या अवहेलनेच्या दुष्टचक्रामधून सुटण्यासाठी, ही माणसं प्रजनन साहाय्य तंत्रज्ञानाच्या आहारी जातात. मात्र आक्रमक आयव्हीएफ, आयसीएसआयसारख्या उपचार पद्धती; अंडाशयांना अतिउत्तेजित करून प्रजनन घडवून आणणं; आणि धंदेवाईक सरोगसी, या गोष्टी नेमक्या कितपत बिनधोक असतात? ‘पॉलिटिक्स ऑफ द वूम्’ हे सिद्ध करतं की सदर प्रजनन साहाय्य उपचार पद्धतींद्वारा मुख्यत्वे काय मिळतं, तर सव्यंग बाळं आणि कणाकणानं विखुरत जाणाऱ्या आया. गर्भाशय रोपणासारख्या पद्धतींकडे पाहण्याचा गुलाबी चष्मा काढणारं; डिझायनर बेबीजबद्दलचं सत्य सांगणारं; जनुकांची सर्रास होत असणारी चोरी दाखवून देणारं; आणि प्रजननाच्या बाजारपेठेत स्त्रीचा कसा वापर केला जाऊन बळी दिला जातो, याबद्दल परखड भाष्य करणारं असं हे पुस्तक आहे. सखोल अभ्यास, तपास आणि विवेचन या सर्व मार्गांमार्फत लेखिका पिंकी विरानी, प्रजननाच्या नावाखाली जगभरात चाललेल्या स्त्रीशोषणाला आवाज फोडते. जागतिक तज्ज्ञ-विशेषज्ज्ञांनी केलेल्या संशोधनांची ग्वाही देऊन, ‘मागणी तसा पुरवठा’ या निलाजऱ्या सबबीखाली भरवल्या जाणाऱ्या प्रजननाच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना रोखठोख जाब विचारते. सगळ्या वाचकांना समजेल अशा पद्धतीनं लिहिलेलं हे पुस्तक, कुठलीही कुचराई न करता, जबाबदार प्रजननासाठी प्रत्येकाला सुयोग्य माहिती मिळवण्याचा हक्क कसा आणि का आहे, याबद्दल सुस्पष्ट भाष्य करतं.