-
Valuche Kille (वाळूचे किल्ले)
मुंबईसारख्या महानगरात वाढलेली, शिकलेली आणि नोकरी करणारी व्यक्ती जीवनाकडे एका वेगळ्या आत्मविश्वासाने बघत असते. अशा व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यातून सतत असा आत्मविश्वास व्यक्त होत असतो. मात्र जीवनात कधी तरी असे काही प्रसंग येतात, अशा काही घटना घडतात, तेव्हा स्वतःवरचा विश्वास डळमळीत होतो. जे आयुष्य आपल्या मुठीत आहे, ते आयुष्य वाळूप्रमाणे हातातून निसटत असतांना बघावे लागते. तेव्हा स्वतःच्या मर्यादांची, हतबलतेची जाणीव टोचते. अशा प्रसंगी लक्षात येते की आपल्याला वाटत होतं ते आपलं आयुष्य म्हणजे एक अजिंक्य, अभेद्य किल्ला; पण प्रत्यक्षात तो असतो एक साधा वाळूचा किल्ला! एक लाट येते आणि किल्ला वाहून जातो. जरा धारदार नजरेने बघितले तर आपल्या आजूबाजूला असे अनेक वाळूचे किल्ले दिसतील.
-
Choukat Vatoli (चौकट वाटोळी)
‘चौकट वाटोळी’ ही कादंबरी मध्यमवर्गीय जगण्याची पठडी, आशा-अपेक्षा, नैतिक-अनैतिकतेच्या धारणा केंद्रित ठेवून बदलते कौटुंबिक वास्तव कवेत घेते. एका सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार स्त्रीच्या जीवनात अपघाताने आलेला परपुरुष आणि त्यातून निर्माण झालेल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांतील गुंतागुंतीचा पट ही कादंबरी मांडते. ती मांडताना व्यक्तिगत सुख-मोह-इच्छा आणि चारित्र्य व सामाजिक प्रतिष्ठेच्या धारणांमधील संघर्ष ती अधोरेखित करते. या कथानकाला विसाव्या शतकाच्या अखेरच्या काळाची म्हणजेच जागतिकीकरण ऐन उंबरठ्यावर उभे ठाकण्याच्या काळाची पार्श्वभूमी लेखकाने खुबीने रचली आहे. एक प्रकारे आज बदलत गेलेल्या समाजाच्या पाऊलखुणा या कादंबरीत दिसतात.