-
Roopavedh (रूपवेध)
मराठी रंगभूमी आणि हिंदी मराठी चित्रपटांमधल्या अनेक भूमिका आपल्या दमदार अभिनयाने अजरामर करणारा रंगकर्मी, ‘रूपवेध’ ही नाट्यसंस्था सुरू करून चाकोरीबाहेरची अनेकानेक उत्तम नाटके रंगमंचावर आणणारा दिग्दर्शक, निर्माता, नाटकांबरोबरच साहित्य, संगीत अशा कलांमध्ये गती असणारा रसिक, सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन, विचारस्वातंत्र्याची चळवळ अशा समाजोपयोगी चळवळींशी जोडलेला सामाजिक कार्यकर्ता असे डॉ. श्रीराम लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडणारे पुस्तक ‘रूपवेध’. मराठी रंगभूमी, चित्रपट, सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अंधश्रद्धानिर्मूलन अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपली स्पष्ट आणि परखड मते मांडली आहेत कधी लेखांतून, कधी भाषणांमधून तर कधी मुलाखतींमधून. डॉक्टरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या या विविधरंगी पैलूंवर प्रकाश टाकणारे त्यांचे लेख, भाषणे आणि पुष्पा भावे, रामदास भटकळ, निखिल वागळे, जब्बार पटेल, महेश एलकुंचवार, अतुल पेठे, सुधीर गाडगीळ, रेखा इनामदार साने, विनया खडपेकर यांच्याबरोबरच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी घेतलेल्या डॉक्टरांच्या मुलाखती यांचे संकलन ‘रूपवेध’ या पुस्तकात केले आहे. मोठ्या आकारातील पाचशे पानांच्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मांडणी सुभाष अवचट यांची असून पुस्तकाचे आशयमूल्य आणि निर्मितीमूल्य यांकडे विशेष लक्ष पुरवणार्या ‘पॉप्युलर’च्या पुस्तकांच्या परंपरेला साजेसे हे पुस्तक आहे.