-
Chirantanacha Gandha (चिरंतनाचा गंध)
'सोलेदाद' आणि 'आतंक' या दोन संग्रहांनंतरचा 'चिरंतनाचा गंध' हा विलास सारंग यांचा मराठीतील तिसरा कथासंग्रह. वर्तमानातील एकाकीपणा, आत्मदुरावा, असंगतता, व्यक्तीच्या मनातील अनाकलनीय काळोख, या सर्व गोष्टींचा वेध घेणारी सारंगांची कथा 'चिरंतनाचा गंध' मध्ये समूहापर्यंत पोहोचली आहे. अगोदरच्या खास आधुनिकवादी आशयसूत्रांमधील ताणतणाव या संग्रहातील कथांनी टिकवून ठेवले आहेतच; त्यांच्या बरोबरीने सारंगांच्या कथेमध्ये आता भूतकाळाला आणि सांस्कृतिक अर्थनिर्णयनाला कळीचे महत्व येऊ लागले आहे. 'चिरंतनाचा गंध' मधील कथांमध्ये आदिम मिथ्यकथा आणि वर्तमान परिस्थिती यांचे अद्भुत मिश्रण आहे. अस्तित्वाच्या कडेलोटापर्यंत येऊन पोहोचलेल्या नैतिकतेचा कस पाहणाऱ्या घटना आहेत. वास्तवापासून अतिवास्तवापर्यंतचे भव्य परिप्रेक्ष्य आहे. या सर्व घटकांना वेधून असणारी सारंगांची विलक्षण तीव्र, अंतर्भेदी अशी कल्पनाशक्तीही आहे. 'चिरंतनाचा गंध' यामुळेच लक्षणीय ठरतो. मराठी कथेला वेगळी परिमाणे देण्याची क्षमता या कथांमधून खात्रीने प्रत्ययाला येते.