-
My Stroke Of Insight
मानवी मनाच्या अंतरंगाचा ठाव घेण्यासाठी मेंदूचा ठाव घेणे अत्यंत आवश्यक ठरते. जगभरातील संशोधक मेंदूवर संशोधन करत असून अजूनही त्यांना मेंदूच्या गुंतागुंतीची उकल झालेली नाही. मानवी शरीराचे नियंत्रण करण्यार्या आणि अणुबॉम्बपासून संगणकापर्यंत असंख्य गोष्टींचा शोध लावणारा मानवी मेंदू हा शास्त्रज्ञ व डॉक्टरांसाठी कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे. डॉ. जिल टेलर यांचे मेंदूवरील संशोधनविषयक अनेक प्रबंध प्रसिद्ध झाले असून स्वत:ला आलेल्या अनुभवावर आधारित एका मेंदू शास्त्रज्ञाचे हे पुस्तक अफलातून म्हणावे लागेल. यात मेंदूची रचना, कार्यपद्धती, आजारांची माहिती लिहिताना सर्वसामान्य वाचकाला कळेल, अशा भाषेत हे पुस्तक लिहिण्याची हातोटी डॉ. जिल यांनी साधली आहे. या पुस्तकात चार टप्पे मांडण्यात आले आहेत. डॉ. जिल यांचे ब्रेन स्ट्रोकपूर्वीचे आयुष्य, त्यांना मेंदूशास्त्रज्ञ का व्हावेसे वाटले, याचा वेध घेताना त्यांच्या शाळा ते विद्यापीठ शिक्षणापर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे. संशोधनासाठी मेंदू उपलब्ध व्हावेत, यासाठी त्यांनी सुरू केलेली चळवळ, त्यांच्या अध्ययन, अध्यापन व संशोधनाचा आढावा, देशभरातील दौरे, गाणारी शास्त्रज्ञ म्हणून मिळालेली त्यांना मिळालेल्या प्रसिद्धीचाही आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.