-
Mahasphotatil Vishva ( महास्फोटातील विश्व )
दहा सप्टेंबर 2008 ला विश्वनिर्मितीचा महास्फोट प्रयोग सुरू झाला आणि त्याबाबतच्या उलटसुलट चर्चाही रंगल्या. अनेकांनी त्यासंबंधीच्या अंधश्रद्धांना खतपाणी घातले. पण त्या वेळी एक महत्त्वाची गोष्ट घडली आणि ती म्हणजे या प्रयोगाने विश्वनिर्मितीचा विषय सर्वसामान्यांपर्यंत नेला. साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो, की हे विश्व आहे तरी कसे? 1920 च्या दशकात एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाने आकाशनिरीक्षणातून विश्व प्रसरणशील आहे, हा सिद्धान्त मांडला आणि विश्वाला गतिमान केले. विश्व फक्त विस्तारतच आहे असे नाही, तर ते वाढत्या गतीने विस्तारत आहे, असे 2011 चा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे सॉल पर्लमुट्टर, ऍडम टीस व ब्रायन स्मिट या तीन खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले. अतिदूरच्या सुपरनोव्हांचा (स्फोट पावणारे तारे) अभ्यास करून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. परिणामी महास्फोट सिद्धान्ताला अधिकच बळकटी मिळाली. अशा या गतिमान विश्वाची आणि "सर्न' (युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च) या ठिकाणी चाललेल्या महाप्रयोगाची माहिती देणारे डॉ. निवास पाटील यांचे "महास्फोटातील विश्व' हे पुस्तक आहे.