-
Hyderabadchee Chittarkatha ( हैदराबादची चित्तरकथा
हैदराबादचे नाव घेतले की आठवतो तो या संस्थानाचा मुक्तिसंग्राम. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही इथल्या उन्मत्त निजामाच्या आडमुठेपणामुळे हैदराबाद स्वतंत्र भारतात विलीन होण्यासाठी १३ महिन्यांचा काळ लागला. सुमारे सव्वाचारशे वर्षांपूर्वी गोवळकोंडा किल्ल्याच्या पायथ्याशी भागानगर या नावाने वसलेल्या या शहराला विविधरंगी इतिहास आहे. याच शहरात जन्मलेल्या धनंजय कुलकर्णी यांनी जन्मगावाच्या आकर्षणापोटी या पुस्तकाचा प्रपंच मांडला आहे. हैदराबादच्या नवाबी ऐश्वर्यापासून सध्याच्या सायबर सिटीपर्यंतचा प्रवास त्यांनी यात प्रभावीपणे मांडला आहे. पुस्तकात छायाचित्रांचाही समावेश असून, त्यातील काही छायाचित्रांमुळे या शहराच्या उंची स्थापत्यरचनेची कल्पना येते. मोत्यांच्या जडणघडणीसाठी व व्यापारासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्धीस आलेले, खानपानात (त्यात बिर्याणी आलीच!) रमलेले, सर्व कलांचा आस्वाद घेणारे हे शहर आजही आपले वेगळेपण राखून आहे, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो.