-
Timiratuni Tejakade Samagra Andhashraddha Nirmul
अंधश्रद्धानिर्मुलनाचे अथक कार्य केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे दिशादर्शक पुस्तक. अंधश्रद्धानिर्मुलनाशी संबंधित सर्व विषयांची अभ्यासपूर्ण, सखोल, तात्विक मांडणी या पुस्तकात केली आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन, फलज्योतिष विज्ञानाच्या कसोटीवर, वास्तू (श्रद्धा) शास्त्राचा अर्थ आणि अनर्थ, स्यूडोसायन्स अर्थात छद्मविज्ञान, मन मनाचे आजार: भुताने झपाटणे, देवीचे अंगात येणे, संमोहन, भानामती, बुवाबाजी, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा हिंदू धर्मालाच विरोध का? या प्रकरणांमध्ये डॉ. दाभोलकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विचार, आचार, उच्चार, संघर्ष आणि सैद्धांतिक मांडणी या पाचही आघाड्यांवर त्यांनी आणि त्यांच्या समितीने काम केले आहे. या कार्याचं आणि विचारांचं महत्व पुस्तकातून अधिक ठळक होत. तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे तीन विभाग केले आहेत. पहिला विभाग अंधश्रद्धा निर्मुलनाशी संबंधित थेट बाबींच्याबद्दल आहे. दुसरा विभाग सर्व बाबींच्या संदर्भात अंनिसने जी कृतीशील झुंज दिली त्याबद्दल आहे. यामुळे वैचारिक मांडणीला प्रत्यक्ष कार्याचा भरभक्कम पाया मिळतो. त्यानंतरचा तिसरा विभाग हा सैद्धांतिक आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाशी संबंधित जे विषय सतत चर्चिले जातात, त्यांची मांडणी केली आहे. याप्रमाणे पहिल्या विभागात वैज्ञानिक दृष्टिकोन, फलज्योतिष विज्ञानाच्या कसोटीवर, मनाचे आजार. भुताचे झपाटणे, भानामती या विषयांची सर्वांगीण मांडणी केली आहे. तर दुसऱ्या विभागात बुवाबाजीच्या संदर्भातील 'साहिबजदीजी करणी', 'कमरअली दरवेशचा चमत्कार', 'लंगरचा चमत्कार', 'गोडबाबा', 'कुशीऱ्याचा दैवी उपचार' यांची माहिती आहे. अशा माहिती सोबतच काही रंजक व उद्बोधक घटना वाचकांना मिळतील.
-
Mati - Bhanamati ( मती - भानामती )
आपोआप फाटणारे, पेटणारे कपडे, अंगावर बिब्याच्या फुल्या, अन्नात विष्ठा, डोळयातून निघणारे खडे- असे गूढ, भीतिदायक प्रकार म्हणजे भानामती-काळी जादू. त्यातून समाजात पसरतो गैरसमज- ही सारी विज्ञानापलीकडची अतर्क्य शक्ती ! मराठवाडयातील भानामती तर आणखी निराळी. फक्त स्त्रियांनाच छळणारी. मग त्या घुमतात, लोळतात, भुंकतात, बेभान अवस्थेत 'भानामती' करणा-याचे नाव सांगतात. ज्या व्यक्तीचे नाव उच्चारले जाते, त्याचे जगणे अवघड बनते. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने गेल्या पंचवीस वर्षांत शेकडो भानामती प्रकरणे शंभर टक्के यशस्वीरीत्या हाताळली. भानामती घडते, तेव्हा ती दूर करण्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची, उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते- हे भान देणारे रहस्यकथेहून रोमांचक वाटेल असे.
-
Andhshraddha Vinashay ( अंधश्रद्धा विनाशाय )
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच हे पुस्तक अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचं दर्शन घडवितं. श्रद्धा तपासून पाहण्याच भान डॉ. दाभोलकर या पुस्तकातून देतात. 'विज्ञानाच्या विकासाचा सारा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे' असं ते म्हणतात. समाजात वर्षानुवर्षे ज्या चुकीच्या रुढी-परंपरांचा पगडा आहे, त्या रुढी हद्दपार करण्यासाठी 'अंनिस' ने केलेल्या आणि करीत असलेल्या लढायांची समग्र माहिती या पुस्तकातून मिळते. प्रवाहाविरुद्ध पोहत असताना होणाऱ्या त्रासाचं, येणाऱ्या अडचणीचं अस्वस्थ दर्शन त्यांतून घडतं. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज यांसारख्या समाजसुधारकांचे विचार प्रत्यक्षात यावेत, हाच या चळवळीमागचा हेतू असल्याचं ते पुस्तकातून सिद्ध करतात. 'हि देशातील दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे' हि भूमिका हि ते मांडतात..