- 
                                    
Raktatuni Vahe (रक्तातुनी वाहे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध, कबीर, फुले यांना गुरुस्थानी मानल्यामुळे त्यांच्या जीवनात आलेल्या असंख्य अडथळ्यांवर त्यांना यशस्वीपणे मात करता आली. मुळातच डॉ. आंबेडकर हे अलौकिक बुद्धिमत्तेचे धनी होते. बुद्धिमत्तेच्या जोडीला या तिन्ही गुरुजनांचे मनस्वी आशीर्वाद लाभल्याने त्यांना आपल्या बुद्धिमत्तेचा वापर समस्त गोरगरिबांच्या कल्याणासाठी व राष्ट्रहितासाठी नेमका करता आला. त्यांचे तेजस्वी कार्य आज जगभरात गौरविले जात आहे. जुन्या पिढीतील लोकांचे ते आदर्श तर होतेच, पण नवीन पिढीसाठी आदर्शासोबतच ते मुख्य प्रेरणास्रोतही बनले आहेत. ही नवीन पिढी त्यांना आपला गुरू मानून उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना दिसत आहे. आंबेडकरी विचारांचा हा समर्थ वारसा असाच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत व दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत झिरपत रहावा यासाठी किशोर मेढे 'रक्तातुनी वाहे' या पुस्तकातील लेखांमधून बाबासाहेबांच्या जीवन- कार्यांच्या काही महत्त्वाच्या पैलूंचा आणि एकूणच आंबेडकरी विचारधारेशी संबंधित असणाऱ्या अनेक विषयांचा सव्यसाची धांडोळा घेतात. या लेखांबरोबरच सुप्रसिद्ध गीतकार गुलजारांच्या त्यांनी मराठीत अनुवादित केलेल्या काही कविता, अमृता प्रितम आणि इमरोज यांचे त्यांनी अनुवादित केलेले काही लेख देखील या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. अशा वैविध्याने नटलेले हे पुस्तक वाचकांना भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही.