-
Bhalchandra Nemade Sahityavichar Aani Kadambarya
भालचंद्र नेमाडे यांच्या प्रातिभ निर्मितीचा आणि साहित्यविचाराचा असलेला अतूट संबंध शोधण्याचा मौलिक प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. नेमाडे यांनी मांडलेल्या वास्तववाद, नैतिकता, बांधिलकी आणि देशीवाद या संकल्पनांचे त्यांच्याच कादंबऱ्यांत उपयोजन आहे. त्यांचा साहित्यविचार व त्यांची कादंबरी सामाजिक वास्तवावर भर देते, वसाहतवादी ज्ञानशाखांना छेद देते; तसेच समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्राकडे आणि संस्कृती विडंबनाकडून संस्कृती स्वीकाराकडे जाताना दिसते- असे या संशोधनाचे सार आहे. नेमाडे मानवी लैंगिकता, संस्कृती, इतिहास यांना नैतिक कसोटी लावतात. बांधिलकीच्या भूमिकेतून जाती-पोटजातींच्या अंत:स्तरावरील मूल्यव्यवस्था, सौंदर्यकल्पना साकारतात. भाषिक कृती करत संस्कृती, परंपरा, मूल्ये आणि प्रदेश, परिसरनिष्ठा, मानवी जाणिवा यांचे सांस्कृतिक आकलन मांडतात. व्यक्तीच्या प्रेरणा, त्याचे जगणे, सृष्टी यांचा मानववंशशास्त्रीय शोध घेतात- अशी या संशोधनाची मांडणी आहे. याशिवाय नेमाडे यांच्यातील सर्जनशील लेखकाने आपली निर्मितिप्रक्रिया साहित्यविचाराच्या चौकटीत कशी कोंबली नाही, हे या ग्रंथात उलगडून दाखवताना संशोधकाने नेमाडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्या गदारोळात कमालीची तटस्थता दाखवली आहे. भालचंद्र नेमाडे यांच्या समीक्षेचा आणि त्यांच्या सर्जनशील निर्मितीचा तटस्थपणे शोध घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांना हा ग्रंथ नक्कीच आश्वासक ठरणार आहे.
-
Samikshecha Antaswar (समीक्षेचा अंत:स्वर)
‘समीक्षेचा अंत:स्वर’ हा प्रा. देवानंद सोनटक्के यांचा ‘सामर्थ्याचा स्वर’ या ग्रंथानंतरचा दुसरा समीक्षाग्रंथ. ग्रंथात एकूण १७ लेख असून ते पूर्वी विविध चर्चासत्र आणि नियतकालिके यांतून प्रसिध्द झाले आहेत. या ग्रंथात साहित्यविचार आणि उपयोजित समीक्षा अशा दोन प्रकारांचे लेख आहेत. कुसुमावती देशपांडे, बा. सी. मर्ढेकर, भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याविचारांची, वसंत आबाजी डहाके यांच्या समीक्षेच्या सांस्कृतिक दृष्टीची चर्चा करणारे तात्विक लेख आहेत तर मर्ढेकर, करंदीकर, अरुण कोलटकर,श्रीधर शनवारे, ग्रेस अरुण काळे, दीपक रंगारी यांच्या कविता आणि श्याम मनोहर (शीतयुद्ध सदानंद), ह. मो. मराठे (काळेशार पाणी) आसाराम लोमटे (इडा पीडा टळो) यांच्या साहित्यकृतींची आस्वादक समीक्षा केली आहे.