-
Eka Aarambhache Prastavik (एका आरंभाचे प्रास्ताविक
असंख्य प्रश्नांनी भरलेल्या या विराट दुनियेत व्यक्तीच्या आपल्या म्हणून असणाऱ्या प्रश्नांना जागा आहे की नाही? जागा असेल किंवा नसेल, जागा द्या किंवा देऊ नका, व्यक्ती म्हणून प्रत्येकाला अशा आपल्या आपल्या फक्त स्वतःच्याच अशा प्रश्नांशी कायमच झगडावं लागत असतं. हे कोणालाही पटावं. ते आपल्या सगळ्यांचं वास्तव असतं. अन हे प्रत्येकी वेगळं असतं. दुनियेत अशी सात अब्ज वास्तवं या घडीला मौजूद आहेत. अन ती सगळी एकमेकांपासून भिन्न आहेत. अन त्या प्रत्येकाची आतली एक भली मोठी दुनिया आहे. तिला काही महत्त्व आहे की नाही?… अशा प्रश्नांची दुनिया घेऊन वावरणारी काही प्रातिनिधिक पात्रं या कादंबरीत आहेत. त्यांच्या प्रश्नांची देवघेव, त्यांचे टकराव, बारक्या बारक्या इच्छा, आकांक्षा आणि हितसंबंधांचे टकराव यांच्यातून कथानक पुढे सरकत जातं. आणि प्रत्येक पात्रासाठी काही एका आरंभाजवळ येऊन थांबतं. असा आरंभ कुठे स्पष्ट कुठे अस्पष्ट सुद्धा असतो. उदाहरणार्थ लमुवेल आणि तुंगाक्का यांच्यासाठी हा आरंभ स्पष्ट दिसतो. बाकीच्यांसाठी तो तितका दिसत नाही. पण तो असतो. कारण कोणताही शेवट हा मुळात आणखी एका आरंभाचं प्रास्ताविकच असतो. म्हणून ही कादंबरी. एका आरंभाचे प्रास्ताविक.
-
Rath (रथ)
१९८४ साली पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या या कादंबरीला वाङ्मयीन चळवळींची विशेषतः ग्रामीण साहित्य चळवळीची पार्श्वभूमी आहे. या चळवळीतील विविध पातळ्यांवरील नेते, कार्यकर्ते, त्यांचे मनोव्यापार, त्यांच्या भूमिका; त्यांचे जगणे या साऱ्याचे वेधक चित्रण व विश्लेषण स्वाभाविकपणेच तिच्यात येते. चळवळी या त्या त्या काळाच्या अपरिहार्य गरजा म्हणून निर्माण होत असतात. माणसं निमित्तमात्र असतात. ती नसती तर त्यांची जागा आणखी कोणीतरी घेतलीच असती, हे खरंच आहे. पण माणसं निवडण्यासाठीची उपलब्धता ही त्या त्या काळाची मर्यादा सुध्दा असते. या मर्यादेचा चळवळीच्या गतिचक्रावर, तिच्या भवितव्यावरही प्रभाव पडत असतो. आणि हे अपरिहार्यही असतं. काही संपतं वा थांबतं तिथून नवं काही सुरू होतच असतं. किंबहुना माणसांना काहीच सुरू करता येत नाही वा थांबवताही येत नाही. दोन्ही प्रकारात कृतीचे जे भ्रम असतात त्यांचा निरास फक्त अनुभवाच्या ज्ञानाच्या उजेडातच होतो. या प्रकारच्या विशाल समझदारीकडं नेणाऱ्या काही दिशा ही कादंबरी प्रस्फुटित करते. स्वातंत्र्योत्तर मराठी ग्रामसमाजातील बदलाचा, त्याच्या विषयीच्या आस्थेच्या पर्यावरणाचा व सांस्कृतिक आकांक्षेचा एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून सुध्दा या कादंबरीकडं पाहता येईल.
-
Shankhatala Manus (शंखातला माणूस)
कथारचनेच्या विविध शक्यतांशी खेळणे हा रंगनाथ पठारे यांचा स्वभाव. मराठीत खूप कमी लेखकांनी कथेच्या रचनेच्या अंगाने तिच्याशी संवाद साधल्याचा दिसतो. कथा एक सत्त्वशोध आणि समकालीन वास्तवाला दिलेली तीव्र प्रतिक्रिया. स्वतःत चाललेली जीवघेणी घालमेल. रंगनाथ पठारे यांच्या प्रत्येक कथेत ही घालमेल प्रत्ययाला येते. ही घालमेल वाचकाला खूप आत आत आवर्तात घेऊन जाते. पठारे मराठी लघुकथेला कथेच्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जात आहेत. रूढ पारंपरिक कथासमीक्षा दृष्टीस हा प्रकार आकळणे थोडे कठीणच. पण पन्नास वर्षांनंतर जो वाचक `गांधीजी अकरा सप्टेंबर 2001’ ही गोष्ट वाचेल तेव्हा या लेखकाच्या असाधारण प्रतिभाशक्तीची प्रगल्भता जाणवू शकेल. पठारे मौखिक परंपरेतील ज्ञानसंक्रमणाचे साधन म्हणून निर्मित झालेल्या कथापरंपरेस पचवून इथल्या मातीच्या कथा रचत आहेत, हे हा संग्रह वाचून प्रत्ययास येते. - राजन गवस