-
Tathakathit (तथाकथित)
विजय तांबे हे गेली २०+ वर्षे अत्यंत निष्ठेने कथा लिहीत आहेत. 'तथाकथित' हा त्यांचा तिसरा कथासंग्रह. ते मूलतः एक प्रयोगशील लेखक आहेत. साहजिकच त्यांच्या कथा प्रामुख्याने 'अनुष्टुभ' सारख्या वाङ्गयीन नियतकालिकात प्रकाशित झाल्या आहेत. कथेमध्ये होणारे बहुतांश प्रयोग हे शैली, घाट आणि आशयाच्या अंगाने होत असतात. विजय तांबे ह्यांचं वेगळेपण असं की ते त्यांच्या कथांमध्ये सामाजिक भान आणि कपोलकल्पित ह्यांची सांगड घालायचा एरवी सहसा न आढळणारा प्रयोग करतात. लहानपणापासून सामाजिक चळवळींशी संबंध आल्याने त्यांची पात्रं, प्रसंग, एकूणच आशयद्रव्य हे त्यांची सामाजिक जाणीव दर्शवणारं असतं. मात्र सामाजिक आशयद्रव्य असणाऱ्या बहुतांश कथा जशा वास्तववादी ढंगाने लिहिल्या जाण्याची वहिवाट आहे ती सोडून ते त्यातून फिक्शन साकारण्याचा प्रयत्न करतात. हे करताना त्यांना उपयोगाची ठरते ती त्यांची दृक्भान असलेली कथनशैली. विजय तांबे ह्यांचे कल्पनाचक्षू खूपच ताकदीचे आहेत. ह्या संग्रहातील 'तथाकथित' ही शीर्षककथा त्यादृष्टीने पुरेशी बोलकी ठरावी. ही कथा त्यांच्या कल्पनाचक्षूनी अशी काही देखिली आणि रेखिली आहे की वाचणाऱ्याला एक प्रतिसृष्टी नजरेसमोर साकार व्हावी. ह्या प्रदीर्घ कथेत त्यांनी केवळ कल्पनेने जे काही बारकावे दिले आहेत ते चकित करणारे आहेत. ह्या संग्रहातील त्यांच्या कथांमध्ये सामाजिक भानाच्या तुलनेत कल्पकता अधिक जाणवते. अर्थात 'भीतीचा मॉल' ह्या कथेत एका गरोदर मातेला तिला होणारे बाळ सुदृढ असेल की नाही ह्या भीतीने तिच्या आत अंधश्रद्धांचे जे थैमान चालते, त्याचे अनेक कंगोरे इतक्या बारकाईने आलेत की त्यातून त्यांची समाजातील आक्षेपार्ह गोष्टींबाबतची निरीक्षणशक्ती अधोरेखित होते. प्रयोगशील लेखकांच्या कथा वाचकांपर्यंत पोहोचणे हे साहित्यसंस्कृतीच्या सकस जोपासनेसाठी अत्यंत आवश्यक असते. ह्यासाठीच विजय तांबे ह्यांची कथा न केवळ अधिकाधिक वाचकांपर्यंत, तर उदयोन्मुख, होतकरू लेखकांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. वास्तववादाच्या आहारी गेलेल्या मराठी साहित्यासाठी ह्या कथा एक अभ्यासाचा असा वस्तुपाठ ठरू शकतात.
-
Sahajtechya Traasachi Suruvaat
मला बघणा-याला मी थिजल्यासारखा दिसेनही कदाचित. बायका आणि सिगारेट... त्यात पुन्हा माझीच बायको !... पुन्हा शिव्याच... पुढं काय करू ! शिव्या किती वेळ घालणार ? मी तसाच बसतो. बायको माझ्याकडं बघून सिगारेट विझवते आणि स्वयंपाकघरात निघून जाते... मी शिव्या थांबवतो आणि थिजलेल्या अवस्थेतून बाहेर येऊन आरामखुर्चीत नीट बसून स्वत:लाच विचारतो, की एवढं मनाला का लावून घ्यायचं ? माझी बायको गॅसवर कुकर ठेवताना बघून मला प्रेम दाटून आलं, कारण नकळतपणे तिनं माझं मनातलं ठामपण गोंजारलं... तीच बायको सिगारेट ओढते... आणि... मला माझ्या मनातल्या ठामपणाला प्रश्न विचारायला लावते. आता आला ना त्रास ! आता जमलं बघा त्रासाचं बरोबर आणि सहजपणे !
-
Jyacha Tyacha
मळलेल्या वाटांची मिरासदारी जरा दूर झटकून, नेहमीचे थांबे, वळणं आणि रुजलेल्या खुणा यांसकट नियम-रिवाजांना अलगद बगल देऊन, नवं काही शोधलं जातं, संपूर्ण परिघाबाहेरचं... तुम्हाला खिळवून ठेवणारं, अंतर्मुख करणारं... अशीच अनुभूती देतो 'ज्याचा त्याचा'