-
-
-
-
Mrudgandh (मृदगंध)
या लेखांना एक प्रकृती आहे. आमच्या लहानपणी कोकणात गूळपाण्याने स्वागत व्हायचे, पण त्यातला आपलेपणा, गोडवा आणि सांस्कृतिक सहजता फार भावायची. त्या गूळपाण्याच्या गडव्याच्या नुसत्या दर्शनाने सात-आठ मैल चालून आल्याचे श्रम पार पळून जायचे. तसे काहीतरी या लेखांत आहे. 'लळा गोजिरा पाखरांचा’ हा लेखच, पाहू या. पाखरांची ओळख आईच्या मांडीवर ("इथं इथं बैस, रे, मोरा") अशी सुरुवात करण्याची कल्पना किती लेखिकांना तरी सुचेल? अशी सुरुवात झालेला लेख या अंगानेच पुढे जातो. "येरे येरे काऊ..." तुळशी कट्ट्यापासची दगडी खल, "विजेत्या तारांच्या तोरणमाळा...." हा लेख नुसताच पाखरांना भेटत जात नाही. तुमच्या जीवनातल्या अनेक सूक्ष्म स्मृती फुलवत जातो, आणि असा जातो, की असे काही होत आहे, याची त्याला जाणच नसते. पाखरांना स्वत:च्या उडण्याची जाण असते का! नसावी - म्हणूनच त्यांची हवेतली आंदोलने इतकी गोड वाटतात. खोलीत अडकलेली चिमणी बाहेर सटकण्यासाठी न सापडणारी वाट शोधते, तेव्हा तिची ती भ्यालेली जाणीव तिच्या उडण्यातले सारे सौंदर्य हिरावून घेत असते- नाही का? तसे, पाखरांच्या साहजिक उडण्यासारखे हे लेख वाटतात...