-
Aambedkari Aai (आंबेडकरी आई)
'आंबेडकरी आई' या संपादित ग्रंथातून आंबेडकरी विचार व आचार याचा उद्बोधक सांधा जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या मुलींना व मुलांना शिकविण्यासाठी केलेला संघर्ष व त्याग याचा लेखाजोखा या ग्रंथात रेखाटला आहे. आंबेडकरी विचारात सर्वच आयांना प्रेरित करण्याचे वैचारिक व नैतिक सामर्थ्य आहे हे दिग्दर्शित केले आहे. डॉ. गोपाळ गुरू निसर्गाला देव मानणाऱ्या लोकसंस्कृतीला, स्त्रीला सन्मान देणाऱ्या मातृसत्ताक सिंधुसंस्कृतीला गाडून या देशात देव-दैवाला केंद्रीभूत मानणारी विषमतावादी पितृसत्ताक धर्मसंस्कृती रुजवली गेली, त्याला पहिला विरोध तथागत गौतम बुद्धानी केला आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा पाया रचला. त्यानंतर ही देवकेंद्री नवससंस्कृती नाकारणारी एक परंपराच या देशात हजारो वर्षांपासून सुरू राहिली. बुद्ध-कबीर-शाहू-फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही परंपरा सांगता येते. म्हणूनच या संपूर्ण परंपरेला घेऊन उभ्या राहिलेल्या समतावादी-विज्ञानवादी तत्त्वज्ञानाची 'आंबेडकरी तत्त्वज्ञान' या नावाने ओळख देता येते. तर या अर्थाने हे तत्त्वज्ञान स्वीकारणारी आणि आपल्या मुलांना त्या मार्गावरून चालण्याची शिकवण देणारी आई ही 'आंबेडकरी आई' होय. ही आई कुठल्याही जाती-धर्माच्या समूहातील असू शकते. पहिल्या पिढीत हे आंबेडकरी तत्त्वज्ञान स्वीकारणारी पूर्वाश्रमीच्या महार सोडून इतर कुठल्याही जातीतील स्त्री सहसा दिसत नव्हती, तरी दुसऱ्या तिसऱ्या आणि आताच्या चौथ्या पिढीत हे तत्त्वज्ञान स्वीकारणाऱ्या इतर जाती-धर्मातील अनेक स्त्रिया दिसताहेत. याही ग्रंथामध्ये बौद्ध समुदायाबरोबरच चर्मकार, मराठा आणि ओबीसी समूहातील स्त्रिया आहेत, ज्यांना आईने किंवा आईसमान सासूने आंबेडकरी संस्कार देऊन घडविलेले आहे. - प्रा. आशालता कांबळे पूर्वश्रमीच्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या स्त्रीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मदीक्षेनंतर, हजारो शतकांच्या वेदनेतून मुक्त होत देव-देव्हारे, रूढी-परंपरा या साऱ्याला नकार देवून बुद्धांचा मार्ग निष्ठेने स्वीकारला आणि ती संविधानसंस्कृतीची पांथःस्थ झाली. डॉ. बाबासाहेबानी दिलेल्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या मूलमंत्राला काळजाशी घट्ट धरत तिने प्रचंड दारिद्र्यात आणि कष्टातही आपल्या लेकरांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. हीच बहुसंख्य आंबेडकरी स्त्री सभा, संमेलने, मोर्चे, आंदोलने आणि उपोषणात गर्दीचा चेहरा होऊन चळवळीच्या समष्टीत पार मिसळून गेली होती. या आंबेडकरी चळवळीच्या पायाभरणीशी उभ्या असलेल्या, पण पडद्यामागे राहिलेल्या ४२ आयांच्या लेकींनी लिहिलेला हा सामाजिक-सांस्कृतिक-चरित्रात्मक दस्तावेज म्हणजेच 'आंबेडकरी आई' हे संपादन होय. डॉ. श्यामल गरुड