-
HRUDYA (हृद्य)
रेखा इनामदार-साने या मनस्वी लेखिका, प्राध्यापिका आणि समीक्षक आहेत. विविध साहित्य-संस्कृती-संगीत वर्तुळांमध्ये उत्साहाने वावरणाऱ्या एक कलासक्त रसिक आहेत. या वर्तुळांमध्ये परिघांवर आणि आतील त्रिज्यांवर जी अनेक सर्जनशील माणसे त्यांना भेटली वा त्या आवर्जून त्यांना भेटल्या, अशा माणसांचे समांतर विश्व त्यांनी या ‘हृद्य’मध्ये उभे केले आहे. रेखा यांना परकायाप्रवेशाची वा परअंतर्ज्ञानाची सिद्धी प्राप्त झालेली नाही. केवळ कुतूहल, सांस्कृतिक जिज्ञासा आणि प्रेम या बळावर त्यांनी या पुस्तकात बारा विविधरंगी, विविधढंगी माणसांचा शैलीदार, चिकित्सक आणि मनोविश्लेषणात्मक कॅलिडोस्कोपिक कॅनव्हास रेखाटला आहे. या कॅनव्हासवर लेखिकेने या व्यक्तींचे स्वभाव, कार्यशैली, त्यांचे कौटुंबिक व सामाजिक जीवन आणि त्यांचा मित्रपरिवार यांचे रंग अतिशय आत्मीयतेने तसेच चिकित्सकपणे भरले आहेत. मी यापैकी बहुतेकांना बऱ्यापैकी ओळखतो; परंतु त्यांच्याबद्दलचे लेखिकेने केलेले वर्णन-विश्लेषण वाचून मला जाणवले की, मला त्यांची खरी ओळखच झाली नव्हती. माझ्या मनातली त्यांची शिल्पे ‘हृद्दा’ वाचल्यानंतर अधिक ठसठशीत झाली आहेत. ज्या वाचकांना ही माणसे माहीत नसतील, त्यांनाही हा पूर्ण सांस्कृतिक कॅनव्हास विलोभनीय वाटेल. -कुमार केतकर
-
A-Joon Tendulkar (अ जून तेंडुलकर)
समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान ‘लेखक’ म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, ललितगद्य व पटकथा – संवाद अशा सर्व लिखित व दृक् – श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी आपल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा उमटवली. समकालीनता व सार्वकालीनता समर्थपणे अभिव्यक्त करणाऱ्या तेंडुलकरांच्या साहित्याचे अर्थनिर्णयन व पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न एकूण सोळा लेखकांनी अंत:स्फूर्तता आणि वैचारिकता यांचा मेळ घालत येथे केला आहे. कारण कटू सत्याचे प्रयोग करणारे ‘तें’ तथा तेंडुलकर अ-जून, आजही प्रस्तुत ठरतात.