-
KalyaMalya - Bhingolya (काळ्यामाळ्या-भिंगोळ्या)
कृष्णात खोतांची काळ्यामाळ्या भिंगोळ्या काय काय आहे ? शिक्षणाच्या बाजारात फोफाट माजलेल्या आर्थिक, नैतिक आणि बौद्धिक भ्रष्टाचाराच्या वर्तमान वास्तवाचा त्रिमितिक एक्सरे. आधुनिक मराठी साहित्याच्या देशीवादी गद्य परंपरेतील महत्त्वाचा नवा आविष्कार. कादंबरीकाराच्या सामाजिक सभानतेशी एकरूप कथन- नीतिमत्ता कशी असावी याचे उत्कृष्ट उदाहरण. ग्रामीण महाराष्ट्रात समाजाच्या सर्वच स्तरावर खोल आत घुसलेली कीड, किडनी विकून जगणाऱ्या शालेय शिक्षकाच्या आणि आत्महत्यांच्या कड्याकडे ढकलल्या गेलेल्या, कोंडीत सापडलेल्याच्या नजरेतून क्षण-दर-क्षण टिपणारा 'समक्ष' अनुभव वृत्तांत. 'आपण दगडं फोडलेली बरी. इथं माणसाला माणूस म्हणून काहीच कसं ऐकायला येत नाही? आपल्या या व्यवस्थेनं मातीच्या गोळ्यांचं दगड तर घडवलं नाहीत?', विचारत, व्यवस्थेचा दगड फोडून दाखवणारी. भारतीय साहित्यात क्लासिक मानल्या गेलेल्या श्रीलाल शुक्लांच्या 'राग दरबारी'च्या कसाची, दमदार राजकीय-वृत्तांत कादंबरी. - गणेश देवी"
-
Gavthan (गावठाण)
"गावठाण" हि कृष्णात खोत यांची पहिलीच कादंबरी." दुसःह दारिद्र्यात जन्मलेल्या,संकटांना सतत सामोऱ्या जाणाऱ्या,उपजत शहाणपण असलेल्या आनंदी नावाच्या दुखी मुलीची-तिच्या उलघाल करणाऱ्या जीवनानुभवाची हि कहाणी. विषण्ण करणारी. आनंदीसामावेत तिचे कष्टकरी आई-वडील, धाकटा भाऊ, मैत्रिणी, सगेसोयरे,दुरावलेलं सासर यांचं-भोवतीच्या गावगाड्याच-हृदयस्पर्शी ह्या कहाणीत येतं. पिकं,गुराढोरं,पशुपक्षी,झाडझूड,डोंगरदऱ्या,वाऱ्याचा भरार,निर्मल नदी,कौल देणारी तांबुजाई आदीचं विलक्षण दर्शन घडतं. मानवी नात्यातील भावबंधांचा भीषण आणि कोमलही रूप प्रकट होतं. आणि एक अख्खं अनोळखी खेडं ओळखीचं होऊ लागतं... कृष्णात खोत यांचं बालपण,पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका खेड्यात गेलेलं. आजही त्यांचं त्या भूमीशी अतूट नातं आहे. त्या आसमंताचा गंध 'गावठाण' मध्ये सर्वत्र भरून राहिला आहे. कुठल्याही पारंपारिक संस्कारांचा स्पर्श नसलेली,सहजपणे उलगडत आलेली हि स्वयंभू कादंबरी मराठी ग्रामीण साहित्याचा नवा टप्पा गाठत असल्याचं जाणवतो.